मेलबर्न, 27 फेब्रुवारी : मेलबर्न, 27 फेब्रुवारी : भारत-न्यूझीलंड यांच्यात झालेल्या सामन्यात पुन्हा एकदा गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी करत भारताला विजय मिळवून दिला. भारतानं दिलेल्या 134 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडला केवळ 129 धावा करता आल्या. भारतीय गोलंदाजांनी पहिल्या चेंडूपासून किवींवर दबाव निर्माण केला. यासह भारतानं सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. भारतानं प्रथम फलंदाजी करताना 133 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडला चांगली सुरुवात करता आली नाही. शिखा पांडेने रेचेल प्रिस्टला बाद करत भारताला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर न्यूझीलंडला कमबॅक करता आला नाही. मात्र मॅडी ग्रीन यांनी कॅटी मार्टिन यांनी अर्धशतकी भागीदारी करत पुन्हा सामन्यात पुनरागमन केले, मात्र राजेश्वरी गायकवाडनं ही जोडी तोडली. अखेरच्या ओव्हरमध्ये अमेलिया केरनं आक्रमक फलंदाजी करत सामन्याचे रुप पलटण्याचा प्रयत्न केला. मात्र भारतानं 3 धावांनी हा सामना जिंकला.
तत्पूर्वी या सामन्यात न्यूझीलंडने टॉस जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. पहिल्या सामन्यात दुखापतग्रस्त झालेल्या स्मृती मानधनाला या सामन्यात संधी देण्यात आली. मात्र तिला विशेष चांगली कामगिरी करता आली नाही. स्मृती केवळ 11 धावा करत बाद झाली. त्यानंतर तानिया भाटिया आणि शेफाली वर्मा यांनी चांगली भागीदारी केली, मात्र तानियाही 23 धावा करत बाद झाली. त्यानंतर जेमिमा रॉड्रिग्ज 10 धावा करत बाद झाली. या सामन्यातही कर्णधार हरमनप्रीत कौरला चांगली कामगिरी करता आली नाही. हरमनप्रीत 1 धाव करत बाद झाली. भारताकडून शेफाली वर्मानं 34 चेंडूत 4 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 46 धावा केल्या. शेफालीला आपले अर्धशतक पूर्ण करता आले नाही. मात्र शेफालीच्या एकहाती खेळीमुळं 20 ओव्हरमध्ये भारतानं 133 धावांपर्यंत मजल मारली. भारताचा सेमीफायनलमध्ये प्रवेश भारतीय महिला संघाने आयसीसी वर्ल्ड कपची दणक्यात सुरुवात केली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या पहिल्याच सामन्यात यजमानांना दणका दिला. यात पुनम यादवनं 4 विकेट घेत भारताला विजय मिळवून दिला होता. तर दुसऱ्या सामन्यात भारतानं बांगलादेशचा पराभव केला. या सामन्यातही पुनम यादवनं 3 विकेट घेतल्या होत्या. भारताकडून शेफाली वर्मानं चांगली कामगिरी केली आहे. या सामन्यातही शेफालीनं 34 चेंडूत 46 धावांची शानदार खेळी केली.