मेलबर्न, 29 फेब्रुवारी : आयसीसी टी-20 महिला वर्ल्ड कपमध्ये भारतानं सलग चार सामने जिंकण्याची कामगिरी केली आहे. आज श्रीलंकेविरुद्ध झालेला सामना भारतानं 7 विकेटनं जिंकला. श्रीलंकेनं दिलेल्या 114 धावांच्या आव्हानाचा पाठलाग भारतानं 14.4 ओव्हरमध्येच केला. यात शेफालीनं पुन्हा एकदा 34 चेंडूत 47 धावांची आक्रमक खेळी केली. मात्र धावबाद झाल्यामुळं शेफालीचे अर्धशतक 3 धावांनी हुकले. श्रीलंकेने दिलेल्या 114 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना शेफाली वर्मा आणि स्मृती मंधाना यांनी 34 धावांची भागीदारी केली. मात्र या सामन्यातही स्मृतीला चांगली खेळी करता आली नाही, 17 धावांवर ती बाद झाली. त्यानंतर कर्णधार हरमनप्रीत पहिल्यांदाच तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आली. मात्र गेल्या तीन सामन्यात फ्लॉप खेळी केलेली हरमन या सामन्यातही 15 धावा करत बाद झाली. भारताकडून शेफालीनं 47 धावांची सर्वोत्तम खेळी केली. मात्र जेमीमा आणि शेफीला यांच्यातील विसंगतीमुळं शेफाली धावबाद झाली. त्यामुळ सलग दुसऱ्यांदा तिचे अर्धशतक हुकले. याआधी बांगलादेशविरुद्ध शेफालीनं 46 धावा केल्या होत्या.
या सामन्यात श्रीलंकेने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र भारतीय महिला गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे श्रीलंकेचे फलंदाज टिकू शकले नाही. राधा यादवने 5 विकेट घेत श्रीलंकेचे कंबरडे मोडले. श्रीलंकेकडून कर्णधार चमेरी अट्टापट्टूने 33 तर कवीशा दिलहारीने 25 धावा केल्या. मात्र श्रीलंकेला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. त्यांनी 20 ओव्हरमध्ये 9 विकेट गमावत 113 धावा केल्या. भारतानं याआधी सलग 3 सामने जिंकत सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. भारताची गोलंदाजी पुन्हा एकदा जमेची बाजू ठरली आहे. शेफालीने वयाच्या 16व्या वर्षी केली कमाल खरं तर टीम इंडियाला अखेर दुसरा विरेंद्र सेहवाग मिळाला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. मात्र हा सेहवाग विराट कोहलीच्या पुरुष संघात नाही तर हरमनप्रीत कौरच्या महिला संघाला सापडला आहे. शेफाली वर्मा असे या फलंदाजाचे नाव आहे. आपल्या छोट्या कारकीर्दीत 16 वर्षीय शेफाली वर्माने गोलंदाजांची झोप उडवली आहे. एकेकाळी क्रिकेटच सराव करण्यासाठी शेफाली मुलगा बनून जायची. आता तिला क्रिकेटमध्ये लेडी सेहवागचे स्थान मिळाले आहे.