मुंबई, 25 मार्च : खांद्याच्या दुखापतीमुळे टीम इंडियाचा खेळाडू श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) इंग्लंडविरुद्धची वनडे सीरिज (India vs England) आणि आयपीएलमधून (IPL 2021) बाहेर झाला आहे. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये फिल्डिंग करत असताना अय्यरच्या डाव्या खांद्याला दुखापत झाली. खांदा निखळल्यामुळे अय्यरचं ऑपरेशन करावं लागणार आहे, त्यामुळे तो कमीत कमी चार महिने क्रिकेट खेळू शकत नाही. क्रिकेटमधून बाहेर गेला असला तरी अय्यरने आपण पुन्हा एकदा पुनरागमन करू, असा विश्वास वर्तवला आहे. श्रेयस अय्यर ट्वीट करून म्हणाला, ‘जेवढा मोठा धक्का, तेवढं मोठं पुनरागमन, असं म्हणलं जातं. मी लवकरच पुनरागमन करेन. तुम्ही दिलेल्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आभार. तुमचे मेसेज मी वाचत आहे.’ मागच्याच आठवड्यात श्रेयस अय्यरने इंग्लंडची काऊंटी टीम लँकशायरसोबत एकदिवसीय स्पर्धा खेळण्यासाठी करार केला होता. रॉयल लंडन कप ही स्पर्धा 23 जुलैपासून सुरू होणार आहे, पण या स्पर्धेसाठीही त्याचं फिट होणं कठीण आहे.
इंग्लंडची बॅटिंग सुरू असताना आठव्या ओव्हरमध्ये शार्दुल ठाकूरच्या (Shardul Thakur) बॉलिंगवर जॉनी बेयरस्टोने ड्राईव्ह मारला. हा शॉट रोखण्यासाठी अय्यरने उडी मारली आणि त्याला दुखापत झाली. यानंतर लगेच श्रेयस अय्यर मैदानातून बाहेर गेला. हॉस्पिटलमध्ये नेऊन त्याचं स्कॅनिंग केलं असता त्याचा खांदा निखळल्याचं समोर आलं. आता उरलेल्या दोन वनडेमध्ये श्रेयस अय्यरऐवजी सूर्यकुमार यादवला संधी दिली जाऊ शकते. आयपीएलमध्ये श्रेयस अय्यर दिल्ली कॅपिटल्सचं नेतृत्व करतो. त्याच्या गैरहजेरीत आता ऋषभ पंत, स्टीव्ह स्मिथ किंवा आर.अश्विनकडे कर्णधारपद दिलं जाऊ शकतं.