आज भारतीय संघातील सर्वात शक्तिशाली फलंदाज असलेल्या युसूफ पठाणचा वाढदिवस आहे.
आज भारतीय संघातील सर्वात शक्तिशाली फलंदाज असलेल्या युसूफ पठाणचा वाढदिवस आहे. गुजरातमधील बडोद्यात जन्मलेला हा खेळाडू आज 38 वर्षांचा झाला आहे. त्याचं कौशल्य पाहता युसूफला फार काळ करिअर करता आलं नाही परंतु छोट्या कारकीर्दीत वर्ल्ड कप विजेत्या दोन संघांत तो होता.
युसूफ पठाण 2007 टी-20 वर्ल्ड कप आणि 2011 वन-डे वर्ल्ड कपच्या विजेत्या संघाचा एक भाग होता. 2011 चा वर्ल्डकप भारताने जिंकल्यानंतर विजय साजरा करताना युसुफने आपल्या खांद्यांवर सचिन तेंडूलकरला घेतलं होतं.
युसूफ पठाणचा जन्म एका अत्यंत गरीब कुटुंबात झाला. गरिबी अशी होती की युसूफच्या घरी शौचालयही बांधायला पैसे नव्हते. परंतु, या गरीबीमुळे युसूफ आणि त्याचा धाकटा भाऊ इरफान याच्या प्रतिभेला कोणताच अडसर निर्माण झाला नाही. युसूफ पठाण हा भाऊ इरफानबरोबर मशिदीच्या अंगणात क्रिकेट खेळायचा. पुढे हे दोन्ही भाऊ टीम इंडियासाठी खेळले.
युसूफ पठाण हा भारतीय क्रिकेटमधील सर्वांत हार्ड हिटर फलंदाज मानला जातो. आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्याच सिझनमध्ये युसूफ पठाणने अवघ्या 37 चेंडूंत मुंबई इंडियन्सविरुद्ध शतक ठोकलं होतं. ख्रिस गेलने 2013 मध्ये यूसुफचा रेकॉर्ड केवळ 30 चेंडूंमध्ये शतक मारून तोडला. तरी युसूफ अजूनही आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेमधील फास्टेस्ट सेंच्युरी करणारा भारतीय आहे.
युसूफ पठाणचा टी-20 डेब्यू तर अप्रतिम होता. 2007 च्या टी-20 वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यापूर्वी वीरेंद्र सेहवागला दुखापत झाली होती आणि महेंद्रसिंग धोनीने युसूफ पठाणला संधी दिली. ओपनिंगवेळी धोनीने युसूफ पठाणला मैदानात उतरवलं आणि या खेळाडूने अवघ्या 8 चेंडूंत 15 धावा फटकावून टीम इंडियाला चांगली सुरुवात करून दिली होती.
युसूफ पठाणने आपल्या कारकीर्दीत 41 वन-डे सामन्यांत 810 धावा केल्या. ज्यात त्याच्या नावावर 2 शतकं आणि 3 अर्धशतकांचा समावेश आहे. युसूफपठाणने भारताकडून 18 टी-20 सामन्यांमध्ये 146.58 च्या स्ट्राईक रेटसह 236 धावा केल्या. याशिवाय युसूफने वन-डे सामन्यांत 33 तर टी-20 मध्ये 13 विकेट्स घेतल्या आहेत.
युसूफ पठाणने भाऊ इरफान पठाण याच्यासोबत 2014 मध्ये क्रिकेट अकॅडमी ऑफ पठान्स उघडली. ग्रेग चॅपल या अकॅडमीचे प्रशिक्षक आहेत. 2013 साली युसुफ पठाणने फिजिओथेरपिस्ट आफरिनशी लग्न केलं. युसूफ पठाणला अयान नावाचा एक मुलगा आहे.