रोनाल्डो पुन्हा मॅनचेस्टर युनायटेडमध्ये
मुंबई, 27 ऑगस्ट : सध्याच्या युगातल्या दिग्गज फूटबॉलपटूंपैकी एक असलेल्या क्रिस्टियानो रोनाल्डोचं पुन्हा एकदा मॅनचेस्टर युनायटेडमध्ये पुनरागमन (Cristiano Ronaldo returns to Manchester United) होत आहे. युवेंटेसकडून खेळणारा रोनाल्डो लवकरच मॅनचेस्टर युनायटेडकडून खेळताना दिसणार आहे. मॅनचेस्टर युनायटेडने स्वत: याची अधिकृत घोषणा केली आहे. रोनाल्डो मॅनचेस्टर युनायटेडकडूनच खेळायचा, यानंतर तो रियाल मॅड्रिडसोबत (Real Madrid) जोडला गेला. स्पॅनिश फूटबॉल लीगनंतर रोनाल्डोने इटालियन फूटबॉल क्लब युवेंटेससोबत करार केला, पण आता पुन्हा तो इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये खेळताना दिसेल. ‘मॅनचेस्टर युनायटेडला तुम्हाला हे सांगताना आनंद होत आहे, की क्रिस्टियानो रोनाल्डोच्या ट्रान्सफरसाठी युवेंटेससोबत करार झाला आहे. रोनाल्डोने क्लबसाी 292 मॅचमध्ये 118 गोल केले. याचसोबत तो पाचवेळा बॅलन डी ओर जिंकला आहे. आपल्या करियरमध्ये त्याने 30 पेक्षा जास्त ट्रॉफी जिंकल्या आहेत, यात युएफा चॅम्पियन्स लीग, चार फिफा वर्ल्ड कप आणि इंग्लंड, स्पेन आणि इटलीमध्ये 7 टायटलचा समावेश आहे. तो पोर्तुगाल आणि युरोपियन चॅम्पियन्स लीगही जिंकला आहे,’ असं मॅनचेस्टर युनायटेडने प्रसिद्धी पत्रक काढून सांगितलं आहे. इंग्लंड आणि इटालियन माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार रोनाल्डोला मॅनचेस्टर युनायटेडने 25 मिलीयन युरो म्हणजेच 216 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमत देऊन विकत घेतलं. रोनाल्डो मॅनचेस्टर युनायटेडसाठी 6 ईपीएल सिझन खेळला, तेव्हा क्लबला 8 किताब मिळाले. यादरम्यान तो बॅलेन डी ओरही जिंकला. मॅनचेस्टर युनायटेडशिवाय मॅनचेस्टर सिटीनेदेखील रोनाल्डोला विकत घेण्यात रस दाखवला होता, पण अखेर युनायटेडने बाजी मारली. क्रिस्टियानो रोनाल्डो मोठ्या नुकसानासह युवेंट्सकडून मॅनचेस्टर युनायटेडकडे येत आहे. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार रोनाल्डोला युवेंटेसने प्रती सिझन 100 मिलियन डॉलर म्हणजेच 734 कोटी रुपये दिले होते, पण आता त्याला मॅनचेस्टर युनायटेडमध्ये 216 कोटी रुपये प्रती मोसम मिळणार आहेत.