दिल्ली, 18 फेब्रुवारी : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात भारताचे दिग्गज फलंदाजही फार काळ मैदानात टिकाव धरू शकले नाहीत. विराट कोहली अर्धशतकाच्या जवळ असतानाच बाद झाला. त्याला पदार्पण करणाऱ्या मॅथ्यू कुह्नेमनने पायचित केलं. या विकेटवरून आता वाद निर्माण झाला आहे. पंच नितिन मेनन यांच्या निर्णयावरून नाराजी व्यक्त करताना नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय. पंच नितिन मेनन यांच्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना आतापर्यंत तरी बरा नसल्याचं दिसतंय. शनिवारी त्यांनी काही चुकीचे निर्णय घेतले. यात कोहलीला बाद देण्याच्या त्यांच्या निर्णयावर टीका केली जातेय. हेही वाचा : कोहलीच्या विकेटवरून वाद? पंचांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह, विराटची रिएक्शन व्हायरल कोहलीला वादग्रस्त पद्धतीने बाद दिलं असल्याचं चाहत्यांनी म्हटलंय. नितिन मेनन यांनी बाद ठरवताच कोहलीने डीआरएस घेतला आणि तिसऱ्या पंचांनीसुद्धा मैदानी पंचांचा निर्णय योग्य मानत विराटला बाद ठरवलं. यात अल्ट्रा एजमध्ये चेंडू आधी पॅडला लागला की बॅटला हे स्पष्ट दिसत नव्हतं त्यामुळे तिसऱ्या पंचांनी विराट बाद असल्याचा मैदानी पंचांचा निर्णय कायम ठेवला.
विराट आणि पंच नितिन मेनन यांच्यात असं पहिल्यांदाच झालेलं नाही. याआधीही आयपीएलस आंतरराष्ट्रीय सामन्यातही विराटला नितिन मेनन यांनी आऊट दिल्यानंतर वाद झाला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध विराटला बाद ठरवल्याच्या निर्णयानंतर विराटच्या चाहत्यांनी पंचांवर टीका केलीय. एका युजरने म्हटलं की, पंच नितिन मेनन ऑस्ट्रेलियाकडून खेळत आहेत. त्यांचा १२ वा खेळाडू आहेत. तर एकाने म्हटलं की, कोहली अनलकी आहे. तर काहींनी मेनन यांना आयपीएलमधून बाहेर करावं असं म्हटलंय.