eng vs nz
मुंबई, 16 फेब्रुवारी : इंग्लंडच्या संघाला कर्णधार बेन स्टोक्स आणि प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलमने बॅझबॉल क्रिकेट शिकवलं आहे. इंग्लंड, पाकिस्तान असो की न्यूझीलंडमधील मैदान, सध्या इंग्लंडचा संघ तुफान फॉर्मात आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटीतील पहिल्या सामन्यातही इंग्लंडच्या संघाचा फॉर्म बघायला मिळत आहे. इंग्लंडच्या संघाने पहिल्या दिवशी वेगाने धावा करत तिसऱ्याच सत्रात डाव घोषित केला. न्यूझीलंडचा कर्णधार टीम साउदीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. तर प्रथम फलंदाजीला उतरलेल्या इंग्लंडची सुरुवात खराब झाली. पहिलीच विकेट १८ धावांवर गेली. त्यानतंर दुसऱ्या जोडीने चांगली भागिदारी केली. पुढच्या फलंदाजांनीही लहान मोठ्या भागिदारी करत संघाच्या धावसंख्येत भर घातली. हेही वाचा : पाकिस्तानी क्रिकेटर नसीम शाहने शेअर केला फोटो, पण उर्वशीच्या कमेंटचीच होतेय चर्चा इंग्लंडने पहिल्या दिवशी ५८.२ षटके खेळताना ९ बाद ३२५ धावांवर डाव घोषित केला. तिसऱ्या सत्राच्या सुरुवातीला इंग्लंडला चार धक्के बसले आणि ९ वा गडी बाद होताच कर्णधार बेन स्टोक्सने डाव घोषित केला. सामन्याच्या पहिल्याच दिवशी बेन स्टोक्सने घेतलेला हा निर्णय धाडसी असल्याचं म्हटलं जातंय. तिसऱ्या सत्रात डाव घोषित करण्यामागे इंग्लंडची रणनिती अशी होती की, नव्या चेंडूने कमी प्रकाशात वेगवान गोलंदाजांच्या मदतीने विकेट घेता येतील. इंग्लंडचा हा डाव त्यांच्या पथ्यावर पडला असून दिवसअखेर न्यूझीलंडची अवस्था ३ बाद ३७ अशी झाली. टॉम लॅथम, केन विल्यम्सन आणि हेन्री निकोलस इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजीसमोर टिकू शकले नाहीत. इंग्लंडकडून हॅरी ब्रूकने जबरदस्त फलंदाजी करताना ८१ चेंडूत १५ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ८९ धावा केल्या. तर बेन डकेटने ६८ चेंडूत ८४ धावांची तुफान खेळी केली. ओली पोपनेही ४२ धावा केल्या. न्यूझीलंडचा गोलंदाज नील वॅगनरला ४ विकेट मिळाल्या. याशिवाय टीम साऊदी आणि स्कॉट कुगलेजिन यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.