मुंबई, 15 डिसेंबर : पाकिस्तानमधील आंतरराष्ट्रीय क्रिकेट (Cricket in Pakistan) हे मोठ्या प्रयत्नांनी सुरू झाले आहे. न्यूझीलंड आणि इंग्लंडच्या टीमनी यापूर्वी पाकिस्तानात खेळण्यास नकार दिला होता. त्यानंतर वेस्ट इंडिजची टीम सध्या पाकिस्तान दौऱ्यावर आहे. टी20 आणि वन-डे सीरिज खेळण्यासाठी वेस्ट इंडिज क्रिकेट टीम पाकिस्तानात आहे. या सीरिजमधील (Pakistan vs West Indies T20 Series) दोन मॅचनंतरच पाकिस्तान टीमचे माजी कॅप्टन वासिम अक्रम (Wasim Akram) आणि शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) यांच्यावर हात जोडण्याची वेळ आली आहे. काय आहे कारण? पाकिस्तान क्रिकेट टीमनं वेस्ट इंडिज विरुद्ध पहिले दोन टी20 सामने जिंकले आहेत. त्यानंतरही पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) क्लीन बोल्ड झाले आहे. पाकिस्तानी नागरिकांनीच त्यांना क्लीन बोल्ड केले. बुधवारी झालेल्या दुसऱ्या टी20 मॅचमध्ये फक्त 4 हजार प्रेक्षकच कराचीतील नॅशनल स्टेडियममध्ये उपस्थित होते. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने तिकीटाचे दर निम्मे केले आहेत. तरीही प्रेक्षकांना स्टेडियममध्ये मॅच पाहण्यासाठी खेचण्यात त्यांना अपयश आलं आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या नामुश्कीमुळे त्यांच्या टीमचे माजी कॅप्टन वासिम अक्रम आणि शाहिद आफ्रिदी यांनी प्रेक्षकांना हात जोडून स्टेडियममध्ये मॅच पाहावी अशी विनंती केली आहे. ‘पाकिस्तान क्रिकेट टीमने मागील महिन्यात चांगली कामगिरी केल्यानंतरही कराचीमधील रिकामे स्टेडियम पाहून खेद वाटतो. याचे कारण आहे हे मला माहिती आहे. पण, मला ते तुमच्याकडून ऐकायचे आहे. क्रिकेट पाहयला येणारे प्रेक्षक कुठे आहेत आणि का? असा प्रश्न अक्रमने ट्विट करत विचारला आहे.
प्रेक्षकांना फ्री एन्ट्री पाकिस्तान विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील टी20 सीरिज फ्लॉप गेली आहे. या अनुभवानंतर आगामी वन-डे सीरिजमध्ये प्रेक्षकांना फ्री एन्ट्री देण्याचा विचार पीसीबी करत आहे, असे वृत्त पाकिस्तानच्या वृत्तवाहिनीने दिले आहे. दरम्यान कराचीमध्ये बुधवारी झालेल्या दुसऱ्या टी20 मॅचमध्ये पाकिस्तानने वेस्ट इंडिजचा 9 रनने पराभव केला. या विजयाबरोबर पाकिस्तानने तीन सामन्यांच्या या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे.