मुंबई, 22 सप्टेंबर : आयपीएल 2021 (IPL 2021) स्पर्धेत पुन्हा एकदा कोरोना व्हायरसचा शिरकाव झाला आहे. सनरायझर्स हैदराबादच्या (SRH) एका खेळाडूला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं वृत्त आहे. हैदराबादची आज लढत दिल्ली कॅपिटल्सशी होणार आहे. या वृत्तामुळे आज होणाऱ्या लढतीचं भवितव्य अनिश्चित झालं आहे. (One Sunrisers Hyderabad player found COVID positive, fate of evening match against Delhi Capitals hinges on RTPCR reports of remaining squad)
‘पीटीआय’ नं दिलेल्या वृत्तानुसार सनरायझर्स हैदराबादच्या टी. नटराजन (T Natrajan) या खेळाडूला कोरोनाची लागण झाली आहे. त्याच्या संपर्कात आलेल्या 6 जणांना आययोलेशनमध्ये पाठवण्यात आलं आहे. यामध्ये हैदराबादचा ऑल राऊंडर विजय शंकर (Vijay Shakar) याचाही समावेश आहे. नटराजनच्या संपर्कात ऑल राऊंडर विजय शंकर, टीम मॅनेजर विजय कुमार, फिजियो श्याम सुंदर जी, डॉक्टर अंजना वानन, लॉजिस्टिक मॅनेजर तुषार खेडकर आणि नेट बॉलर पेरियास गणेशन होते. या सर्वांना आयसोलेशनमध्ये पाठवण्यात आलं आहे. हैदराबाद आणि दिल्लीच्या बाकी खेळाडूंचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. त्यामुळे आज (22 सप्टेंबर) रोजी होणारी मॅच नियोजित वेळापत्रकानुसार होईल, अशी माहिती बीसीसीआयनं (BCCI) दिली आहे. आयपीएल स्पर्धेला यापूर्वी देखील कोरनाचा फटका बसला होता. आयपीएलच्या बायो-बबलमध्ये करोनाचा शिरकाव झाल्यानं यापूर्वी 29 मॅचनंतर भारतामध्ये सुरू असलेली आयपीएल स्पर्धा स्थगित करण्यात आली होती. त्यानंतर भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यातील मँचेस्टर टेस्ट देखील टीम इंडियाचे हेड कोच रवी शास्त्रींसह सपोर्ट स्टाफला कोरोनाची लागण झाल्यानं रद्द करण्यात आली. आयपीएल स्पर्धेचा दुसरा टप्पा रविवारी सुरु झाला आहे. दुसऱ्या टप्प्यातील 3 मॅच झाल्यानंतर लगेच आयपीएलच्या बायो-बबलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याचं उघड झालं आहे.