मुंबई, 30 सप्टेंबर : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India Women vs Australia Women) यांच्यातील एकमेव टेस्टला सुरुवात झाली आहे. भारतीय महिला टीमची ही पहिलीवहिली डे-नाईट टेस्ट (Pink Ball Test) आहे. या टेस्टचा पहिल्या दिवसात पावसाचा अडथळा आला. पण, त्यापूर्वी भारताच्या स्मृती मंधानानं (Smriti Mandhana) दमदार अर्धशतक झळकावलं. पिंक बॉल टेस्टमध्ये अर्धशतक करणारी स्मृती पहिली भारतीय महिला ठरली आहे. या टेस्टमध्ये भारताकडून बॅटर यास्तिका भाटिया आणि फास्ट बॉलर मेघना सिंह यांनी पदार्पण केलं आहे. तर यजमान ऑस्ट्रेलियानंही चार खेळाडूंना पदार्पण करण्याची संधी दिली आहे. यामध्ये स्टेला कॅम्पबेल (Stella Campbell) हिचा देखील समावेश आहे. उजव्या हातानं फास्ट बॉलिंग टाकणाऱ्या स्टेलाला टेस्ट कॅप देण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या पुरुष क्रिकेट टीमचा फास्ट बॉलर मिचेल स्टार्क ( Mitchell Starc) उपस्थित होता. त्यानं टेस्ट कॅप दिल्यानंतर स्टेलाची गळाभेट घेतली. त्या भेटीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
कोणत्याही क्रिकेटरच्या आयुष्यात टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण करणे हा मोठा क्षण असतो. स्टेलाच्या आयुष्यात तो क्षण गुरुवारी आला. स्टेलाच्या या यशाचा आनंद मिचेल स्टार्कला देखील झाल्याचं या फोटोमधून स्पष्ट होत आहे. मुलींच्या यशाचा आनंद साजरा करणारी कॅडबरीज डेअरी मिल्कची जाहिरात सध्या प्रचंड गाजत आहे. मुलगी मैदान गाजवत आहे आणि तिला चीअर करायला तिचा मित्र प्रेक्षकांत बसलेला या जाहिरातीमध्ये दाखवण्यात आला आहे.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पिंक बॉल टेस्टमध्ये या जाहिरातीचा प्रसंग प्रत्यक्षात घडला आहे. स्टेला मैदान गाजवण्यासाठी सज्ज झालेली असतानाच तिला सपोर्ट करण्यासाठी मिचेल स्टार्क मैदानात उपस्थित होता. स्टार्कला तिच्या यशाचा प्रचंड आनंद झाला आहे. त्यामुळेच भारावून त्यानं स्टेलाला मिठी मारलीय. ऐतिहासिक टेस्टमधील हा खास फोटो पाहणारा प्रत्येक जण यामुळे भारावून गेला आहे.