विराट कोहलीचा तो निर्णय धोनीने बदलला आणि सामन्याचं चित्र बदललं
नागपूर येथे झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विराटच्या शतकानंतरही भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध 250 धावाच करता आल्या. त्यानंतर गोलंदाजीच्या बळावर भारताने हा सामना जिंकला.
ऑस्ट्रेलियाला केवळ 251 धावांचे आव्हान दिल्यानंतरही भारताने 8 धावांनी रोमहर्षक विजय मिळवला. या सामन्यात गोलंदाजांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
आस्ट्रेलिया संघाला 250 धावांच्या आत रोखण्याचा दबाव भारतीय संघावर होता. यावेळी कर्णधार विराट कोहलीची एक चूक भारताला पराभवाकडे घेऊन गेली असती.
यावेळी मैदानात असलेल्या माजी 'कॅप्टन कूल'ने विराटला सल्ला दिल्ला. विजयानंतर प्रतिक्रिया देताना विराटने याची माहिती दिली.
विराट म्हणाला की, 46 वे षटक विजयला टाकण्यासाठी देण्याचा विचार करत होतो. याची चर्चा रोहित आणि धोनी यांच्याशी केली. त्यावेळी त्यांनी शमी आणि बुमराहला संधी देण्यास सांगितले.
त्यांचे म्हणणे होते की जर बुमराह आणि शमीने एक-दोन गडी बाद केल्यास सामना आपल्या हातात येईल. विराटने त्यांचे म्हणणे ऐकले आणि त्याचाच परिणाम म्हणजे भारताने सामना जिंकला.
बुमराहने 46 व्या षटकात कूल्टर नाईल आणि पेंट कमिन्स यांना बाद केले. या षटकात भारताला 2 विकेट मिळाल्या आणि विजयाचा मार्ग मोकळा झाला.
सामन्याचे शेवटचे आणि निर्णायक षटक विजय शंकरला देण्यात आले. त्याने याआधी फक्त एकच षटक टाकले होते. अशा परिस्थितीत विजय शंकरने कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवत या षटकात दोन गडी बाद करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.