चेन्नई, 15 फेब्रुवारी : चेन्नईच्या फिरत्या पिचवर बॅटिंग कशी करायची असते हे आर. अश्विनने (R. Ashwin) दाखवून दिलं आहे. आठव्या क्रमांकावर आलेल्या अश्विनने त्याच्या टेस्ट करियरमधील पाचवी सेंच्युरी झळकावली. त्याच्या सेंच्युरीमुळे टीम इंडियाकडे चेन्नई टेस्टमध्ये भक्कम आघाडी आहे.
भारताच्या पहिल्या सत्राचत पाच विकेट्स झटपट गेल्या. एका बाजूनं विकेट्स पडत असताना विराट कोहली खंबीरपणे दुसरीकडे उभा होता. पहिल्या टेस्टच्या चौथ्या इनिंगमध्ये देखील विराट उभा होता. त्याला कुणीही साथ दिली नाही. दुसऱ्या टेस्टमध्ये आर. अश्विननं (R. Ashwin) ही कमतरता भरुन काढली. जॅक लीच आणि मोईन अली हे इंग्लंडचे स्पिनर धोकादायक बनले होते. या स्पिनर्सचा कोहली-अश्विन जोडीनं शांतपणे सामना केला. पहिल्या इनिंगमध्ये शून्यावर आऊट झालेल्या विराट कोहलीने दुसऱ्या इनिंगमध्ये निर्णायक क्षणी हाफ सेंच्युरी झळकावली. विराटची ही टेस्ट क्रिकेटमधील 25 वी हाफ सेंच्युरी आहे.
विराट आणि अश्विन जोडीनं सातव्या विकेटसाठी 96 रनची भागिदारी केली. ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून सातत्यानं चांगली बॅटिंग करणाऱ्या आर. अश्विननं देखील टेस्ट क्रिकेटमधील 12 वी हाफ सेंच्युरी झळकावली. 2017 नंतरची ही अश्विनची पहिलीच हाफ सेंच्युरी आहे. भारताचा स्कोअर 200 च्या पुढे गेल्यानंतर विराट कोहली 62 रन काढून आऊट झाला. त्यानंतरही अश्विननं एका बाजूनं संघर्ष सुरुच ठेवला. अश्विनच्या झुंजार खेळीमुळे भारतानं 250 चा टप्पा ओलांडला. भारताचे नऊ आऊट झाल्यानंतर अश्विनची सेंच्युरी हुकणार अशी शंका निर्माण झाली होती. त्यावेळी अश्विननं जिद्दीनं खेळ करत घरच्या मैदानावर सेंच्युरी झळकावण्याचा पराक्रम केला आहे.