मराठमोळा ऋतुराज गायकवाड भारतीय संघाचा नवा कर्णधार
नवी दिल्ली, 14 जून : महाराष्ट्र आणि विशेषकरुन पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय पुरुष संघाची घोषणा करण्यात आली आहे. बीसीसीआयने शुक्रवारी 14 जुलैच्या रात्री संघ निवडीची माहिती दिली. या महत्त्वाच्या स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या संघाचे कर्णधारपद मराठमोळ्या ऋतुराज गायकवाड याच्याकडे देण्यात आले आहे. इंडियन प्रीमियर लीगमध्ये धमाका करणाऱ्या रिंकू सिंगलाही संघात संधी देण्यात आली आहे. यशस्वी जैस्वालचाही संघात समावेश करण्यात आला आहे. तर जितेश शर्मा यष्टीरक्षक म्हणून संघात स्थान मिळवण्यात यशस्वी झाला आहे. धवनला संघात स्थान नाही अनुभवी फलंदाज शिखर धवनला संघात स्थान मिळालेले नाही. मीडिया रिपोर्टमध्ये असे म्हटले जात होते की धवन आशियाई क्रीडा स्पर्धेत संघाचे नेतृत्व करेल. परंतु, त्याला संघात स्थान मिळू शकले नाही. आशियाई क्रीडा स्पर्धा 2023 मध्ये चीनमधील हांगझोऊ येथे 23 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर या कालावधीत होणार आहेत. एकदिवसीय विश्वचषक (5 ऑक्टोबर-नोव्हेंबर 19) सोबत आशियाई खेळांच्या तारखा सोबत येत असल्याने पुरुषांच्या स्पर्धेत द्वितीय श्रेणीचा भारतीय संघ मैदानात उतरला आहे. 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय पुरुष क्रिकेट संघ : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, राहुल त्रिपाठी, टिळक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, आवेश खान, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार , शिवम मावी, शिवम दुबे, प्रभसिमरन सिंग (यष्टीरक्षक). स्टँडबाय खेळाडू: यश ठाकूर, साई किशोर, व्यंकटेश अय्यर, दीपक हुडा, साई सुदर्शन. वाचा - जैसवालचे ‘यशस्वी’ पदार्पण, पहिल्याच सामन्यात केले अनेक विक्रम भारत प्रथमच आपला क्रिकेट संघ पाठवत आहे आशियाई क्रीडा स्पर्धेत तिसऱ्यांदा क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. 2010 आणि 2014 च्या गेम्समध्ये एक क्रिकेट इव्हेंट देखील आयोजित करण्यात आला होता, जिथे BCCI ने पुरुष किंवा महिला संघ पाठवला नाही. 2010 च्या गेम्समध्ये बांगलादेश आणि पाकिस्तानने अनुक्रमे पुरुष आणि महिला गटात सुवर्णपदक जिंकले. आणि 2014 मध्ये श्रीलंकेने पुरुष गटात आणि पाकिस्तानने महिला गटात सुवर्णपदक जिंकले होते. गेल्या वर्षीच 10 ते 25 सप्टेंबर दरम्यान 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धा होणार होत्या. मात्र, चीनमध्ये कोरोना विषाणूचे प्रकरण वाढल्यानंतर हे खेळ पुढे ढकलण्यात आले होते. एकूणच आशियाई क्रीडा स्पर्धा चीनमध्ये तिसऱ्यांदा होणार आहेत. चीनची राजधानी बीजिंगने 1990 मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले होते, तर ग्वांगझूला 2010 मध्ये या प्रतिष्ठेच्या खेळाचे आयोजन करण्याची संधी मिळाली. महिला संघाचीही घोषणा आशियाई क्रीडा स्पर्धेतील महिला क्रिकेट स्पर्धेसाठीही टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. महिला संघाचे कर्णधारपद हरमनप्रीत कौरच्या हाती असेल. सर्व प्रमुख खेळाडूंना संघात स्थान मिळाले आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेतील पुरुषांच्या स्पर्धा 28 सप्टेंबरपासून, तर महिलांच्या स्पर्धा 19 सप्टेंबरपासून सुरू होणार आहेत. दोन्ही क्रिकेट स्पर्धा टी-20 फॉरमॅटमध्ये आयोजित केल्या जातील. आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय महिला संघ : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा, ऋचा घोष (यष्टीरक्षक), अमनजोत कौर, देविका वैद्य, अंजली सरवानी, तितास साधू, राजेश्वरी , मिन्नू मणी, कनिका आहुजा, उमा छेत्री (यष्टीरक्षक), अनुषा बरेड्डी. स्टँडबाय लिस्ट: हरलीन देओल, काश्वी गौतम, स्नेह राणा, सायका इशाक, पूजा वस्त्राकर