सिडनी, 13 मार्च : जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे अनेक क्रीडा स्पर्धांवर परिणाम झाला. स्पर्धा रद्द करण्याऐवजी त्या प्रेक्षकांशिवाय आयोजित करण्यात येत आहेत. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात शुक्रवारपासून एकदिवसीय मालिकेला सुरुवात झाली. यामध्ये पहिला सामना सिडनीत प्रेक्षकांशिवाय खेळला गेला. कोरोना व्हायरसनंतर खबरदारी म्हणून रिकाम्या स्टेडियममध्ये खेळवण्यात आलेला हा पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना आहे. चाहत्यांना फक्त टीव्ही आणि लाइव्ह स्ट्रीमिंगवर सामना पाहता येईल. यावेळी खेळाडूंना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सोशल मीडियावर या सामन्यातील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ऑस्ट्रेलियानं या सामन्यात प्रथम फलंदाजी केली. यावेळी अॅरॉन फिंच 37 धावांवर खेळत होता. तेव्हा इश सोधीच्या गोलंदाजीवर फिंचने जबरदस्त षटकार मारला आणि चेंडू रिकाम्या स्टेडियममध्ये गेला. तेव्हा प्रेक्षक नसल्यानं चेंडू आणण्यासाठी न्यूझीलंडचा खेळाडू लॉकी फर्ग्युसनला जावं लागलं. यानंतर ट्विटरवर हा व्हिडिओ व्हायरल झाला. खेळाडूंना आता चाहत्यांचं महत्त्व समजत असेल असं म्हटलं. तर काहींनी हे तर गल्ली क्रिकेट असल्याचं वाटत आहे असंही म्हटलं.
याबाबत क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे प्रमुख केविन रॉबर्ट्स यांनी म्हटलं की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा पर्याय चांगला असून निर्णय योग्य आहे. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना सिडनीत खेळला जात आहे. यानंतर दुसरा सामना रविवारी होईल.
ज्या प्रेक्षकांनी तिकिटे खरेदी केली आहेत त्यांना पैसे परत दिले जातील. तसंच फक्त माध्यमांना सामन्याला उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र खेळाडूंपासून दूर राहण्याची सूचना दिली आहे. अद्याप न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेबद्दल निर्णय घेण्यात आलेला नाही. तर ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा तात्पुरता स्थगित केला आहे.