नवी दिल्ली, 25 मार्च: इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या वन-डे मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय (IND vs ENG ODI) संघाने विजय मिळवला आहे. त्यामुळे सध्या भारतीय चाहते खूश आहेतच पण ते वाट पाहत आहेत या वर्षीच्या इंडियन प्रीमिअर लीग टी-20 क्रिकेट (Indian Premier League 2021) स्पर्धेची. आयपीएल स्पर्धा (IPL 2021) 9 एप्रिलपासून सुरू होणार आहे. सर्व संघ सराव करत आहेत. अशातच चेन्नई सुपर किंग्ज संघाने आपली नवी जर्सी लाँच (Chennai Super Kings New Jersey Launched) केली आहे. ही जर्सी या वर्षीच्या आयपीएलमध्य एम. एस. धोनीचे धुरंधर वापरणार आहेत. चेन्नईचा कर्णधार धोनीने (MS Dhoni) या हंगामासाठी तयार केलेली जर्सी लाँच केली. या जर्सीत बराच बदल केला गेला असून त्यामध्ये भारतीय लष्कराच्या कॅमोफ्लेजलाही स्थान देण्यात आलं आहे. भारतीय लष्कराच्या सन्मानार्थ चेन्नईने असं डिझाइन केलं आहे. आज ही नवी जर्सी लाँच करतानाचा धोनीचा व्हिडीओ चेन्नई संघाच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून प्रसिद्ध करण्यात आला. या नव्या जर्सीचा रंग पिवळाच आहे पण त्यात खांद्याच्या जागी कॅमोफ्लेज देण्यात आला आहे.
लेफ्टनंट कर्नल धोनीच्या मनात लष्कराबद्दल आदर वर्ल्ड कप विजेत्या भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याला 2011 मध्ये टेरिटोरियल आर्मीने मानद लेफ्टनंट कर्नल पोस्ट देऊन त्याचा गौरव केला होता. वर्ल्ड कपमधील विजयानंतर धोनीच्या आयुष्यातील हा खूप महत्त्वाचा क्षण होता असं मानलं जातं. त्यानी पॅरा कमांडो ट्रेनिंग पूर्ण केलं आहे, शिवाय हेलिकॉप्टरमधून पॅराशूटसह उडी पण मारली आहे. 2019 च्या वर्ल्ड कप स्पर्धेनंतर धोनी काश्मीरमध्ये पॅराकमांडो ड्युटीही त्याने बजावली आहे. एवढंच नाही तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील निवृत्ती जाहीर करण्यासाठीही त्याने भारताचा स्वातंत्र्यदिन 15 ऑगस्ट हा दिवस निवडला. धोनीच्या मनात भारतीय लष्कराबद्दल प्रचंड आदर आहे. त्याचंच प्रतिबिंब आपल्याला चेन्नई सुपर किंग्जच्या नव्या जर्सीतही दिसतं आहे. हे धोनीचं शेवटचं आयपीएल असेल**?** गेल्या वर्षी दुबईत झालेल्या आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्ज संघाने फारशी चांगली कामगिरी केली नव्हती. पॉइंट टेबलमध्ये चेन्नई संघ सातव्या स्थानी होता. या वर्षी चेन्नईने नव्या खेळाडूंना संघात स्थान दिलं आहे आणि ते चांगली कामगिरी करतील अशी अपेक्षा आहे. गेल्यावर्षी धोनीची वैयक्तिक कामगिरीही फारशी चांगली झाली नव्हती. त्याचं वय जास्त असल्यामुळे मर्यादा येत असल्याचं त्याच्या खेळण्यावरून जाणवत होतं. त्यामुळे गेल्यावर्षीच ही चर्चा सुरू झाली होती की धोनी 2021 मध्ये आयपीएल खेळेल का? पण यंदा तो खेळणार असल्याने आता हा प्रश्न 2022 मध्ये धोनी आयपीएलमध्ये खेळेल का असा विचारला जाऊ लागला आहे. धोनी दरवेळी अशा प्रश्नांना आपल्या कामगिरीतून, फलंदाजीतूनच उत्तर देत आला आहे त्यामुळे यावेळीही तिच अपेक्षा करूया.