क्रिस गेलने ठोकला उत्तुंग सिक्स
मुंबई, 27 ऑगस्ट : विस्फोटक बॅट्समन क्रिस गेलने (Chris Gayle) आपल्या वादळी खेळीने जागतिक क्रिकेटमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. क्रिस गेलच्या मोठ्या सिक्स पाहून बॉलरही त्याला बॉलिंग करायला घाबरतात. कॅरेबियन प्रीमियर लीगमध्येही (CPL 2021) गेलने असाच एक अफाट शॉट मारला. या सामन्यात तो 12 रन करूनच आऊट झाला, पण चर्चा मात्र त्याच्या या शॉटचीच झाली. ओशेन थॉमसने (Oshane Thomas) गेलला बोल्ड केलं गेलने बॉलरच्या डोक्यावरून मारलेल्या सिक्सने खिडकीची काचच फोडली. गेलची टीम सेन्ट किट्स ऍण्ड नेव्हिसने या सामन्यात बारबाडोस रॉयल्सचा 21 रनने पराभव केला. वॉर्नर पार्कमध्ये झालेल्या या सामन्यात गेल सेन्ट किट्ससाठी तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंगला उतरला. युनिव्हर्स बॉस म्हणून ओळख असलेल्या गेलने जेसन होल्डरच्या (Jason Holder) बॉलिंगवर सरळ सिक्स मारली. हा बॉल साईट स्क्रीनच्या वर असलेल्या खिडकीच्या काचेवर जाऊन आदळला. सीपीएलने आपल्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेयर केला आहे.
इनिंगच्या पाचव्या ओव्हरच्या पाचव्या बॉलला गेलने विरोधी टीमचा कर्णधार जेसन होल्डरच्या बॉलिंगवर हा सिक्स लगावला आणि खिडकीच्या काचेचा चक्काचूर झाला. सेन्ट किट्सने या मॅचमध्ये 20 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून 175 रन केले. शेरफेन रदरफोर्डने 43 बॉलमध्ये 2 फोर आणि 4 सिक्सच्या मदतीने 53 रनची खेळी केली. याशिवाय ड्वेन ब्राव्होने 35 बॉलमध्ये 1 फोर आणि 4 सिक्स मारून 47 रनची नाबाद खेळी केली. रदरफोर्ड आणि ब्राव्हो यांच्यात पाचव्या विकेटसाठी 115 रनची पार्टनरशीप झाली. होल्डर आणि थॉमसने प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना बारबाडोसने 7 विकेट गमावून 154 रन केले. शाय होप सर्वाधिक 44 रन करून आऊट झाला.