pat cummins
अहमदाबाद, 10 मार्च : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चौथ्या कसोटीत पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने वर्चस्व राखले. दरम्यान, दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होण्याआधी एक वाईट बातमी समोर आलीय. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सच्या आईचे निधन झाले. आईची प्रकृती बिघडल्यानेच पॅट कमिन्स दोन कसोटी सामन्यानंतर मायदेशी परतला होता. पॅट कमिन्सच्या आईच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर खेळाडूंनी दुसऱ्या दिवशी मैदानात उतरताना काळी फित बांधून श्रद्धांजली वाहिली. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने याबाबत ट्विट केले असून त्यांनी लिहिलं की, मारिया कमिन्स यांच्या निधनाने खूप दु:ख झाले. ऑस्ट्रेलिया क्रिकेटकडून पॅट कमिन्स आणि त्याच्या कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. श्रद्धांजली वाहण्यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ आज दंडाला काळी फीत बांधून मैदानात उतरेल.
ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार पॅट कमिन्स आईचे आजारपण बळावल्याने आणि तिच्यासोबत राहण्यासाठी दोन सामन्यानंतर मायदेशी परतला होता. कमिन्सने ऑस्ट्रेलियात परतल्यानंतर म्हटलं होतं की, मी सध्या भारतात न परतण्याचा निर्णय घेतला आहे. आई आजारी आहे आणि तिची सेवा करण्यासाठी मी इथे आलोय.