मेलबर्न, 12 फेब्रुवारी : आयसीसी महिला टी-20 वर्ल्ड कपआधी भारत-ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या तीन देशांमध्ये टी-20 मालिकेचे आयोजन करण्यात आले होते. यातील अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताचा धावांनी पराभव केला. भारताकडून स्मृती मांधनाने सर्वात जास्त 66 धावा केल्या. मात्र मांधनाला इतर फलंदाजांची साथ मिळाली नाही. ऑस्ट्रेलियानं दिलेल्या 156 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला चांगली सुरुवात करता आली नाही. शेफाली वर्मा 10 धावांत बाद झाली. त्यानंतर स्मृती मांधनाने एकहाती भारताचा डाव सांभाळला. स्मृतीने 12 चौकारांच्या मदतीने 178.37च्या स्ट्राईक रेटने 66 धावा केल्या. यासह या मालिकेत 216 धावांसह मांधनाने सर्वात जास्त धावा केल्या. तर, राजश्री गायकवाडने या मालिकेत सर्वात जास्त 10 विकेट घेतल्या.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे ऑस्ट्रेलियाला 20 ओव्हरमध्ये 155 धावा करता आल्या. भारताकडून दिप्ती शर्माने 30 धावा देत 2 तर राजश्री गायकवाडने 32 धावा देत 2 विकेट घेतल्या. ऑस्ट्रेलियाकडून बेथ मुनीने सर्वात जास्त 71 धावा केल्या. या मालिकेत भारतीय महिला क्रिकेट संघाचे प्रदर्शन चांगले राहिले होते. पहिल्या सामन्यात भारताने इंग्लंडचा 5 गडी राखून पराभव केला. मात्र, यानंतर त्याला ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड विरुद्ध सलग 2 सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. टी -20 तिरंगी मालिकेच्या त्यांच्या तिसर्या आणि शेवटच्या सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला 7 गडी राखून पराभूत केले, ज्यामुळे संघ अंतिम फेरीपर्यंत पोहोचला. मात्र अंतिम सामन्यात भारताला विजय मिळवता आला नाही.