होबार्ट, 14 जानेवारी : इंग्लंडविरुद्धच्या ऍशेस सीरिजमध्ये (Ashes Series) ऑस्ट्रेलियाची (Australia vs England 5th Test) सुरूवात चांगली झाली नाही. होबार्टमध्ये सुरू झालेल्या या पाचव्या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाने 12 रनवरच 3 विकेट गमावल्या होत्या. तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्या मार्नस लाबुशेनने (Marnus Labuschagne) 44 रन केले, पण तो स्टुअर्ट ब्रॉडच्या (Stuart Broad) बॉलिंगवर भलत्याच प्रकारे आऊट झाला. त्याच्या या विकेटचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मार्नस लाबुशेन आऊट होणारा ऑस्ट्रेलियाचा चौथा खेळाडू होता. 53 बॉलच्या या खेळीमध्ये त्याने 9 फोर मारले. ब्रॉड जेव्हा इनिंगची 23 वी ओव्हर टाकण्यासाठी आला तेव्हा लाबुशेन ऑफ स्टम्पच्या जास्तच बाहेर गेला, ज्यामुळे त्याचा अंदाज चुकला आणि तो बोल्ड झाला. हा शॉट मारण्याच्या गडबडीत लाबुशेन खेळपट्टीवरच पडला. अशाप्रकारे आऊट झाल्यामुळे लाबुशेनला सोशल मीडियावर ट्रोलही करण्यात येत आहे.
इंग्लंडचा कर्णधार जो रूट याने या सामन्यात टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. लाबुशेन आणि हेड यांच्यात चौथ्या विकेटसाठी 71 रनची पार्टनरशीप झाली. हेडने 113 बॉलमध्ये 12 फोरच्या मदतीने 101 रन केले. कॅमरून ग्रीन 74 रन करून आऊट झाला. दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाचा स्कोअर 241/6 एवढा झाला आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या तिन्ही टेस्ट जिंकून आधीच ऍशेस जिंकली आहे. इंग्लंडला चौथी टेस्ट ड्रॉ करण्यात यश आलं होतं.