प्राजक्ता पोळ, मुंबई 03 मे : ट्रिपल केसरी विजय चौधरीला पोलीस खात्यात डीवायएसपी म्हणून नोकरी मिळालीये. गेल्या अनेक वर्षाच्या संघर्षाचा अखेर चांगला शेवट झालाय. पैलवान ट्रिपल केसरी विजय चौधरीच्या नावापुढे आता आणखी एक पदवी लागणार आहे. विजय चौधरी आता डीवायएसपी होणार आहे. विजय चौधरीला पोलीस खात्यात क्लास वन अधिकाऱ्याची नोकरी मिळालीये. मुख्यमंत्र्यांनी दोन वर्षांपूर्वी त्याला दिलेलं वचन पूर्ण केलंय. सरकारकडून नोकरी मिळत नसल्यानं विजय हताश होता. त्यानं त्याच्या वेदना आयबीएन लोकमतजवळ बोलूनही दाखवल्या होत्या. नोकरीचं आश्वासन मिळाल्यानंतरही त्याच्या वडिलांना मंत्रालयाचे खेटे घालावे लागत होते. पण अखेर नोकरी मिळाल्याने त्याच्या वडिलांनाही अत्यानंद झालाय. विजयला क्लास टू किंवा क्लास थ्री नोकरी मिळू शकली असती पण मुख्यमंत्री क्लास वनसाठी आग्रही होते असा दावा आमदार अनिल पाटलांनी केलाय. खेळाडूंचा गुणवंतांना सरकारनं विजयसारखा यथोचित सत्कार केल्यास गुणवंतांच्या या भूमितून आणखी काही तारे चमकतील यात शंकाच नाही.