पुणे-सोलापूर हायवेवर भीषण अपघात
चंद्रकांत फुंदे, प्रतिनिधी पुणे, 25 जून : सोलापूर महामार्गावरील खेडेकर मळा परिसरात आयशर टेम्पो, चारचाकी कार आणि दुचाकी यांचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले असून 7 जण किरकोळ जखमी झाले आहेत. ही घटना दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. अपघातग्रस्त व्यक्तींना कस्तुरी प्रतिष्ठान, लाईफ केअर रुग्ण वाहिकेच्या मदतीने उरुळी कांचन येथील गणराज हॉस्पिटल, सिध्दीविनायक हॉस्पिटल, झेड प्लस हॉस्पिटल या ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. हा टेम्पो पुणे बाजूकडे निघाला होता. तर चारचाकी गाडी सोलापूरच्या दिशेने निघाली होती. टेम्पोमध्ये बांधकामाच्या लोखंडी प्लेट होत्या. यावेळी टेम्पो चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि सोलापूरच्या बाजूने निघालेल्या चारचाकी गाडीवर जाऊन आदळला.
बाजूने जाणाऱ्या एका दुचाकीलाला या ट्रकने ठोकले. अपघात एवढा भीषण होता की टेम्पो हा चारचाकी गाडीच्या बोनेटवर जाऊन थांबला. यावेळी गाडीत असलेल्या पती -पत्नी व त्यांच्या दोन मुलांना किरकोळ जखम झाली आहे तर टेम्पोतील दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. दुचाकीवरील व्यक्तीही जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.