पुणे, 24 जुलै : पुणे-मुंबई प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आज (सोमवारी) दुपारी 2 तास पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे बंद ठेवण्यात येणार आहे. रविवारी रात्री या महामार्गावर दरड कोसळली होती. या दरडीचा मलबा आणि डोंगरावर अडकलेले दगड काढण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. सोमवारी दुपारी 12 ते 2 या कालावधीमध्ये एक्स्प्रेस-वे बंद ठेवण्यात आलाय. फक्त कारसाठी जुन्या पुणे-मुंबई महामार्ग शीग्रोबा घाटातील वाहतूक सुरू राहिल, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आलीय.
रविवारी रात्री कोसळलेल्या दरडीमुळे पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे वरील वाहतुकीला मोठा परिणाम झाला होता. रविवारी रात्री 10.35 च्या आसपास खंडाळा घाटातील अदोशी बोगद्याजवळ ही दरड कोसळली होती. त्यामुळे जवळपास 6 तास वाहतुकीवर मोठा परिणाम झाला होता, असं वृत्त ‘आज तक’ नं दिलंय.
या दुर्घटनेत सुदैवानं कुणी जखमी झालं नाही. पण, ट्रॅफिक जाममुळे अनेकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. गेल्या आठवड्यात मुंबई आणि परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसाचा परिणाम मध्य रेल्वेवरही झाला आहे. पुणे-मुंबई मार्गावरील अनेक एक्स्प्रेसही पावसामुळे रद्द कराव्या लागल्या होत्या.