उच्चभ्रू सोसायटीजवळ रस्ता खचला
गोविंद वाकडे, प्रतिनिधी पिंपरी चिंचवड, २० जुलै : राज्यात मुसळधार पावसानं अक्षरश: थैमान घातलं आहे. त्यामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचलं आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. तर मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये सखल भागांत मोठ्या प्रमाणत पाणी साचलं आहे. मुसळधार पावसानं वाहतुकीचे तीन तेरा झाले आहेत. नागरिकांची दाणादाण उडाली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे सौदागर परिसरातील उच्चभृ सोसायटी समोरील रस्ता खचल्याची घटना समोर आली आहे. सोसायटीना पाणीपुरवठा करणाऱ्या पाईप लाईन तुटल्या, रहदारीला मोठी अडचण रस्ता खचल्याने निर्माण झाली आहे. प्लॅनेट मिलेनियम सोसायटी समोर ही घटना घडल्याची माहिती मिळाली आहे.
रस्ता खचल्याची दृश्य एका व्यक्तीने आपल्या मोबाईल कॅमेरा मध्ये देखील घेतली आहेत. पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे सौदागर परिसरामध्ये एका इमारतीचे बांधकाम सुरू असताना इमारती जवळ असलेला रस्ता अचानक खचला आहे. प्लॅनेट मिलेनियम सोसायटी जवळ असलेल्या रस्त्याला लागून एका इमारतीच बांधकाम करण्यासाठी एक मोठा खड्डा खोदण्यात आला होता. त्या खड्ड्याला लागून असलेला रस्ता आज सकाळी अचानक खचला आहे. त्यामुळे रस्त्यावरून जाणारी एका बाजूची वाहतूक पूर्णपणे थांबविण्यात आली आहे. रस्ता खचल्यामुळे पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटून मोठे नुकसान झालं आहे.