टीम इंडियाचा महान खेळाडू एमएस धोनी (MS Dhoni) हा सध्या आयपीएल स्थगित झाल्यामुळे त्याच्या रांचीच्या फार्म हाऊसवर सुट्टी एन्जॉय करत आहे.
गोविंद वाकडे, प्रतिनिधी : टीम इंडियाचा महान खेळाडू एमएस धोनी (MS Dhoni) हा सध्या आयपीएल स्थगित झाल्यामुळे त्याच्या रांचीच्या फार्म हाऊसवर सुट्टी एन्जॉय करत आहे. त्यातच आता धोनीने पिंपरी-चिंचवडमध्ये (Pimpari-Chinchwad) नवीन घर घेतल्याचं वृत्त समोर आलं आहे. पिंपरी-चिंचवडमधलं वातावरण आवडल्यामुळे त्याने इकडे घर घ्यायचा निर्णय घेतला.
एमएस धोनी हा अनेकवेळा आंतरराष्ट्रीय मॅच खेळण्यासाठी पुण्याच्या गहुंजे स्टेडियमवर यायचा. तसंच आयपीएलमध्येही तो दोन वर्ष रायजिंग पुणे सुपरजायंट्सकडून खेळला, तेव्हा या टीमचं होम ग्राऊंडही गहुंजे स्टेडियमच होतं. गहुंजे स्टेडियमच्या आसपासच्या परिसरातील निसर्ग सौंदर्याची धोनीला भुरळ पडली आणि त्याने इकडे घर घ्यायचं ठरवलं.
एस्टाडो प्रेसिडेन्शियल असं धोनीने घर घेतलेल्या सोसायटीचं नाव आहे. पुण्यात काही कामासाठी जर येणं झालं तर धोनी इकडेच येऊन राहतो. सोसायटीतल्या काही जणांनी धोनीला पहाटे 5 वाजता जॉगिंग करतानाही पाहिलं आहे.
धोनीला असलेली निसर्गाची आवड सर्वश्रूत आहे. याचमुळे धोनीने रांचीमध्ये मोठं फार्म हाऊस उभारलं आहे. धोनीच्या फार्म हाऊसमध्ये सेंद्रीय पद्धतीने शेती होते.
त्याच्या शेतातून वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आणि फळं रांचीच्या बाजारात विकण्यासाठी नेल्या जातात. धोनीच्या या भाज्या आणि फळांना रांचीच्या बाजारातही मोठी मागणी आहे. याचसोबत धोनीच्या फार्म हाऊसमधून कोणतीही प्रक्रिया न केलेलं दूधही विक्रीसाठी जातं.
धोनीच्या शेतातला माल विकण्यासाठी काहीच दिवसांपूर्वी रांचीमध्ये नवीन दुकान सुरू झालं आहे. या दुकानात धोनीच्या फार्म हाऊसमध्ये सेंद्रीय पद्धतीने पिकवलेल्या भाज्या आणि फळांची विक्री होते.