जनावरांवर हल्ला करणारा बिबट्या
रायचंद शिंदे, पुणे, 17 जुलै: आजकाल धोकादायक प्राण्यांचा वावर मानवी वस्तीकडे जास्त प्रमाणात दिसून येत आहे. रात्री, दिवसा, कोणत्याही वेळी ते बेधडकपणे येऊन लोकांवर, प्राण्यांवर हल्ले करताना दिसत आहे. त्यांच्या भितीपोटी अनेक नागरिकांनी आपल्या घरी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. दिवसेंदिवस प्राण्यांच्या हल्ल्याच्या घटना वाढत चालल्या आहेत. नुकतीच एक घटना समोर आली आहे ज्यामध्ये जनावरांवर हल्ला करणारा बिबट्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील वळती येथील काटवण वस्तीत श्रीहरी बबन भोर यांच्या घरासमोरील गोठ्यातील जनावरांवर हल्ला करणाऱ्या बिबट्याचा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद झाला आहे. यामुळे परिसर भीती पसरली आहे.
वळती गावच्या पूर्वेला तीन किलोमीटर अंतरावर काटवान वस्ती आहे. येथील श्रीहरी बबन भोर यांनी शुक्रवारी सायंकाळी नेहमीप्रमाणे गोठयात गाई आणि कुत्रा घरासमोरील गोठ्यात बांधले. रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास बिबट्यानं जनावरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. परंतु गोट्याभोवती लोखंडी जाळी लावल्यानं बिबट्याचा हल्ल्याचा डाव फसला.
जनावरांच्या आवाजाने भोर घराबाहेर पळत आले. त्यामुळे बिबट्याने तेथून धूम ठोकली. सदरची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. काटवाण वस्ती परिसरात बिबट्याचा वापर वाढला असून अनेक शेतकऱ्यांना बिबट्या दिसला. वन विभागाने काटवाण वस्तीत लवकरात लवकर पिंजरा लावावा व बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे.