Flute
पुणे, 25 जून : प्रसन्न स्वरामुळे मनाचा ठाव घेणारी बासरी (Flute) शिकण्याची अनेकांची तीव्र इच्छा असते. परंतु कोणाकडे शिकायची हा मोठा प्रश्न असतो. ही समस्या आता अमूल्यज्योती या संस्थेने दूर केली आहे. गेल्या 33 वर्षांपासून बासरीच्या संशोधनात कार्यरत असणाऱ्या डॉ. पं. केशव गिंडे यांनी केशव वेणू फ्ल्युट अकादमीची स्थापना केली आहे. याद्वारे यू ट्यूब चॅनेलच्या माध्यमातून मोफत प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती अमूल्यज्योती संस्थेचे संस्थापक डॉ. पं. केशव गिंडे यांनी दिली आहे. (amulya jyoti trust free teaching flute in youtube) अमुल्यज्योती ही वेणुप्रेमी संस्था गेली 33 वर्षे बासरी आणि संगीत या विषयावर सातत्यपूर्ण प्रचार, प्रसार, प्रबोधन, संशोधन आणि सादरीकरण या पाच तत्त्वांवर कार्यरत आहे. कोणतीही कला, विशेषत: संगीत शिकण्यासाठी विद्यार्थ्याला गुरू आवश्यक असतो. त्यासाठी विद्यार्थ्याला नियमितपणे गुरूंकडे जाऊन शिकावे लागते. हे शक्य होण्यासाठी विद्यार्थी आणि गुरू हे एकाच शहरात किंवा प्रदेशात असणे आवश्यक आहे. परिणामी दुसऱ्या राज्यात किंवा परदेशात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना घर सोडून गुरूंकडे शिकावे लागते. वाचा :
‘माझ्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा दिवस’; सिद्धार्थ जाधवची ‘ती’ पोस्ट नेमकी कशाबाबत?
आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला ते अशक्य आहे. संगीताला वाहिलेल्या विद्यार्थ्यांना हे शक्य असेलही परंतु आवड किंवा छंद म्हणून बासरी किंवा संगीत शिकणाऱ्या व्यक्तीला अशक्यच आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना या कारणास्तव संगीत शिकता येत नाही. त्यामुळेच डॉ. पं. केशव गिंडे यांना बासरी शिकणाऱ्या शिष्यांची ही अडचण जाणवत होती. ती दूर करण्यासाठी डॉ. पं. केशव गिंडे यांनी तंत्रज्ञानाचा वापर करून डिजिटल पद्धतीने बासरी शिकण्यासाठी एक खास अभ्यासक्रम सुरू केला आहे. अभ्यासक्रमांत काय शिकायला मिळेल? विद्यार्थ्याला बासरी धरणे, फुंकीच तंत्र, बोटं ठेवण्याची शास्त्रशुद्ध पद्धत, अलंकार, स्वर, ताल, राग मांडणी, ठुमरी, टप्पा, भजन, सिने गीत, ख्याल, धृपद अंग, तंतकारी, राग विस्तार, मिंड , घसीट, तंतकारी, ई. बासरी आणि संगीतातील सर्व विषयांचा सखोल अभ्यास करता येईल. हा कोर्स कोणासाठी असेल? हा कोर्स सर्व वयोगटातील व्यक्तींसाठी तयार केला आहे. यामुळे लहान मुलं, महिला आणि पुरुष, नोकरदार, व्यावसायिक आदी सर्वांना बासरी शिकणे अगदी घरबसल्या शक्य होईल. केशव वेणू फ्ल्युट अकादमीच्या या यूट्यूब चॅनेलवर हा अभ्यासक्रम सर्वांसाठी विनामूल्य उपलब्ध होणार आहे. या ऑनलाइन माध्यमातून घरच्या-घरी बासरी सहज शिकता येईल. यात नवशिक्यापासून ते तज्ज्ञांपर्यंतचा संपूर्ण अभ्यासक्रम असेल.
गुगल मॅपवरून साभार…
कुठे शिकवला जाणार हा कोर्स? यूट्यूब चॅनलवरून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन व्हिडिओ कॉलिंगद्वारे आठवड्यातून एक दिवस अकादमीच्या गुरूंचे या चॅनलवरून https://youtu.be/NACgkevtlTw मार्गदर्शन मिळणार आहे. चौकशीसाठी विद्यार्थी अकादमीच्या या मोबाईल क्रमांकावर 9004396006 संपर्क साधू शकतात. तसेच डीएव्ही पब्लिक स्कूलजवळ गीता बांगला संकल्प पार्क, औंध, पुणे महाराष्ट्र 411067 ह्या पत्त्यावर वर भेट देऊ शकतात.