रेल्वेच्या बोगीला लागली आग
सुमित सोनवणे, प्रतिनिधी पुणे, 17 जुलै : ओडीशा राज्यातील बालासोर येथील रेल्वे अपघातामुळे संपूर्ण देश हादरला होता. बालासोर येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघातात अनेकांचे जीव गेल्यानंतर रेल्वेच्या सुरक्षा प्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अशात आता पुणे जिल्ह्यातून एक मोठी घटना समोर येत आहे. दौंड रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक सहाच्या बाजूला उभ्या असणाऱ्या यार्ड मधील साईडला उभ्या केलेल्या रेल्वेच्या रॅकमधील एका बोगीला अचानक आग लागली. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र, रेल्वे बोगीचे मोठ्या प्रमाणत नुकसान झालं आहे.
काय आहे घटना? दौंड रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक सहाच्या बाजूला उभ्या असणाऱ्या यार्ड मधील साईडला उभ्या केलेल्या रेल्वेच्या रॅकमधील एका बोगीला अचानक आग लागली. अचानक आग लागल्याने रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची मोठी धावपळ उडाली. ही आग नेमकी कशामुळे लागली हे मात्र अद्याप समजू शकले नाही. दरम्यान घटनास्थळी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले असून आग विझविण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या आगीत रेल्वेच्या बोगीचे नुकसान झाले. अग्निशमन दल येईपर्यंत पाईपाने पाणी मारुन आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात येताना व्हिडीओत पाहायला मिळत आहे. वाचा - आता रेल्वेप्रमाणेच एसटी बसचंही लोकेशन करता येणार ट्रॅक; प्रवाशांना मिळणार मोठा दिलासा रेल्वे किती सुरक्षित? संपूर्ण भारतात 68 हजार किमीपेक्षा जास्त मोठे रेल्वेचे जाळे आहे. यापैकी केवळ दक्षिण मध्य रेल्वेच्या 1455 किमी रेल्वे मार्गावर सध्या सुरक्षा कवच ही प्रणाली बसवण्यात आली आहे. इतरत्र कुठेच ती कार्यान्वित नाही. तर दिल्ली मुंबई आणि दिल्ली हावडा सेक्शन वरील 2951 किमीच्या रेल्वे मार्गावर सुरक्षा कवच प्रणाली बसवण्यासाठी कंत्राट काढण्यात आले असून हे काम 2024 मध्ये पूर्ण होणे अपेक्षित आहे. तसेच जास्त वाहतूक असलेल्या 35736 किमी रेल्वे मार्गावर कवच प्रणाली बसवण्यासाठी परवानगी मिळाली आहे. या व्यतिरिक्त सध्या महाराष्ट्रसह भारतात इतर काही सुरक्षा प्रणाली अस्तित्वात आहेत. जसे की ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग, जी सध्या 3600 किमी रेल्वे मार्गावर कार्यरत आहे, यासोबत इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टीम देखील बसवण्यात आली आहे जी सध्या 2572 स्टेशनवर कार्यान्वित झालेली आहे. तर मुंबईसारख्या शहरात ए डब्ल्यू एस नावाची सिस्टीम बसवण्यात आली आहे.