रशियाने अगदी कमी वेळात कोरोनाची लस तयार करून संपूर्ण जगाला धक्का दिला. स्पुतनिक व्ही (Sputnik V) या लशीचं सुरुवातीचे ट्रायल यशस्वी झालं असून ही लस सुरक्षित असल्याचा दावा रशियाने केला आहे.
ट्रायलमध्ये शास्त्रज्ञांना, त्यानंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या मुलीला ही लस देऊन त्याच्या सुरक्षिततेची हमी देण्यात आली आणि आता रशियाने व्यापक स्तरावर लोकांना ही लस देण्यासाठी पावलं उचलली आहे.
रशिया तब्बल 40,000 लोकांना ही लस देणार आहे. इतक्या लोकांवर चाचणी करणार आहे. रॉयटर्सने याबाबत वृत्त दिलं आहे. रशियान न्यूज एजन्सी TASS हे लशीच्या उत्पादकांनी गुरुवारी ही माहिती दिल्याचं सांगितलं.
रशियामध्ये कोरोनाची लस ही रशियन आरोग्य मंत्रालयाशी संबंधित असलेल्या गमलेया संशोधन संस्थेनं तयार केली आहे. या लशीचं दोन महिन्यातच सुरुवातीचे दोन क्लिनिकल ट्रायल करण्यात आले आहेत. मात्र तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल पूर्ण करण्याआधीच ही लस लाँच करण्यात आली.
लशीच्या सुरक्षिततेबाबत तज्ज्ञांनी प्रश्न उपस्थित केले. 20 देशांनी या लशीच्या अब्जावधी डोसची आधीच ऑर्डर दिल्याचा दावा रशियाने केला. मात्र जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) रशियन लशीबाबत जगाला सावध केलं आहे.
जगातील 9 कोरोना लशी क्लिनिकल ट्रायलच्या शेवटच्या टप्प्यात आहेत. मात्र यामध्ये रशियाच्या स्पुतनिक व्ही (Sputnik V) या लशीचा समावेश नाही. या लशीबाबत आपल्याकडे काहीही माहिती नाही. त्यामुळे ही लस किती सुरक्षित असेल हे सांगू शकत नाही, असं WHO ने म्हटलं आहे.