मासिक पाळीच्या (menstrual period) समस्या म्हणजे एखाद्या आजाराचं लक्षण असू शकतं. त्यामुळे सामान्य समजून त्याकडे दुर्लक्ष करू नका.
मासिक पाळीदरम्यान प्रत्येक महिलेला कोणत्या ना कोणत्या समस्येला सामोरं जावं लागतं. प्रत्येक महिलेची मासिक पाळीशी संबंधित समस्या वेगवेगळ्या असतात.
वेब एमडीच्या रिपोर्टनुसार तुम्हाला प्रत्येक तासाला पॅड चेंज करावे लागत असतील, असा अति रक्तस्राव होत असेल किंवा एक आठवड्यापेक्षा जास्त रक्तस्राव होत असेल, रक्ताच्या गुठळ्या होत असतील तर तुमच्या गर्भाशयात किंवा हार्मोन्समध्ये समस्या असू शकते. पेल्व्हिक इन्फ्लेमेटरी डिसीज, ब्लड डिसॉर्डर, रक्त पातळ करण्याची औषधं जसं की अॅस्पिरीन किंवा कॉपर आययूडी ही यामागील कारणं असू शकतात.
जेव्हा रक्तस्राव जास्त होतो तेव्हा तुमच्या शरीरातील लाल रक्तपेशीही कमी होतात, ज्यामुळे शरीरात लोहाची कमतरता उद्भवते आणि अॅनिमियाचा धोका बळावतो. तुम्हाला अशक्तपणा, थकवा, श्वास घ्यायाला त्रास, शरीर फिकट पडणं, हृदयाचे ठोके वाढणं अशी लक्षणं दिसली तर ब्लड टेस्ट करून योग्य ते उपाय करून घ्या.
मासिक पाळी चुकणं हे प्रेग्नन्सीचं लक्षण आहे. मात्र ताणतणाव, अनियंत्रित हार्मोन्स, वजन कमी असणं आणि काही औषधांचाही मासिक पाळीवर परिणाम होतो. जर सलग तीन महिने तुम्हाला मासिक पाळी आलीच नाही तर डॉक्टरांशी संपर्क करा. याशिवाय तुम्हाला त्वचेवरील केस अधिक वाढणं, अॅक्ने, वजनावर नियंत्रण न राहणं अशी लक्षणं दिसील तर ही पीसीओएसची लक्षणं असू शकतात.
पहिल्यांदाच मासिक पाळी आल्यानंतर ती अनियंत्रित असते. त्यावेळी वर्षभर समस्या उद्भवतात मात्र त्यानंतर सामान्यपणे दर तीन आठवड्यांनी मासिक पाळी येते. पण तुमची मासिक पाळी जर 24 दिवसांपेक्षाही आधी येत असेल तर डॉक्टरांकडे जा.
पाळीच्या सुरुवातीच्या दिवसात रक्ताचा रंग हा लाल असतो. अति रक्तस्राव होत असल्यास रक्त गडद लाल रंगाचं असतं, शिवाय रक्ताच्या गुठळ्याही असतात. त्यानंतर पाळीचे दिवस वाढतात किंवा शेवटच्या दिवशी तुम्हाला रक्ताचा रंग ब्राऊन झालेला दिसतो. हवेशी संपर्कामुळे असं होत असल्याचं सांगितलं जातं.
बहुतेक महिलांना मासिक पाळीच्या कालावधीत ओटीपोट, मांड्या, कमरेत वेदना होतात. पाळीच्या पहिल्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी या वेदना होतात. काही महिलांना थकवा आणि डायरियादेखील होतो. मासिक पाळीच्या कालावधीत गर्भाशय आकुंचन-प्रसरण होत असतं, त्यामुळे ही समस्या उद्बवते. जसजसं तुमचं वय वाढतं तसतशी समस्या कमी होते आणि जेव्हा मूल होतं तेव्हा ही समस्या कायमची जाते.
काही महिलांना पाळीच्या फक्त सुरुवातीच्या दिवसात नाही तर पाळी सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंत वेदना होतात आणि हे सामान्य नाही. गर्भाशयात रक्ताचा स्तर दुसऱ्या ठिकाणी तयार होणं, गर्भाशयात एखादी गाठ असणं, पेल्व्हिक इन्फ्लेमेटरी डिसीज असणं यामुळे संपूर्ण मासिक पाळीत वेदना होतात. यामुळे वंध्यत्वदेखील ओढावू शकतं.
मासिक पाळीच्या कालावधीत काहींना डायरिया तर काहींना बद्धकोष्ठता होता. यासह अति रक्तस्राव आणि तीव्र क्रॅम्प्स होत असली तर endometriosis असू शकतं.
पाळीच्या पहिल्या दिवशी तुम्हालाही डोकेदुखी जाणवत असेल तर याला मासिक पाळीतील मायग्रेन असं म्हणतात. एस्ट्रोजनची पातळी कमी झाल्यामुळे ही समस्या उद्भवते. काही पेनकिलरमुळे ही समस्या थांबते किंवा डॉक्टर एस्ट्रोजनची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी गोळ्या देतात.