PHOTOS - असा रंगला 'उंच माझा झोका'

आज महिलांनी अनेक क्षेत्रांत प्रगती केलेली आहे, तरीही कुटुंब, संस्कृती आणि पूर्वापार चालत आलेल्या परंपरेद्वारे मर्यादा लादल्या जातात. स्त्रियांना सक्षम करणे म्हणजे समाज सक्षम करणे. स्त्रियांना सन्मानित करण्याचा 'झी मराठी' वाहिनीचा एक निष्ठावान प्रयत्न म्हणजे उंच माझा झोका पुरस्कार. यंदाचं हे या पुरस्कार सोहळ्याचं सहावं वर्ष, 'मी आता थांबणार नाही' हे ब्रीद वाक्य घेऊन हिरीरीने पुढे येऊन समाजसुधारणेसाठी तसेच इतर क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांचा गौरव करण्यात आला. उंच माझा झोका २०१८' पुरस्कार सोहळा नुकताच संपन्न झाला. या पुरस्कार सोहळ्यात मराठी सिनेसृष्टीतील तारकांनी चारचाँद लावले. सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बापट हिने अंगावर काटा आणेल अशा प्रेरणादायी गाण्यांवर नृत्य सादर केले.

अभिनेत्री सोनाली खरे आणि दीप्ती केतकर यांनी जुन्या आणि नव्या परंपरेची सांगड घालत एक सुंदर परफॉर्मन्स सादर केला. पारंपरिक मंगळागौरीचे खेळ आणि सध्याच्या धकाधकीच्या जीवनात फिट राहण्यासाठी योगसाधना करणारी आजची पिढी यांची जुगलबंदी दीप्ती केतकर आणि सोनाली खरे यांना सादर केली. या व्यतिरिक्त या पुरस्कार सोहळ्यात सोनाली कुलकर्णी, किशोरी शहाणे, निर्मिती सावंत, मृणाल कुलकर्णी, सुलोचना चव्हाण, श्वेता मेहंदळे हे कलाकार तसेच मेधा पाटकर, स्नेहलता देशमुख हे मान्यवर उपस्थित होते. उंच माझा झोका पुरस्कार २०१८ चे सूत्रसंचालन प्रेक्षकांनी लाडकी राधिका म्हणजेच अभिनेत्री अनिता दाते आणि आईआजी म्हणजेच ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनी केले. महिलांना उद्योजिका बनवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या मीनल मोहाडीकर, लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या आणि कामगार संघटक मुक्ता मनोहर, नाशिकमधील आनंदनिकेतन या मराठी शाळेच्या प्रवर्तक आणि संस्थापक विनोदिनी पिटके-काळगी यांचा गौरव केला. १५ हजार प्राण्यांवर उपचार करून त्यांची प्रेमाने शुश्रूषा करून त्यांच्या अधिवासात सुखरूप नेऊन सोडणाऱ्या सृष्टी सोनावणे, भारतीय क्रिकेट संघामधून आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणारी महिला क्रिकेटपटू पूनम राऊत, मराठी मनाला लावणीची गोडी लावणाऱ्या राजश्री नगरकर यांच्या कार्याचा यावेळी गौरव करण्यात आला.

Trending Now