लॉकडाऊनमध्ये पोटदुखीची तक्रार असणाऱ्या रुग्णांमध्ये 70 टक्के वाढ झाली आहे.
कोरोनाव्हायरसच्या संक्रमणाला आळा घालण्यासाठी देशभरात गेल्या काही महिन्यांपासून लॉकडाऊन घोषित करण्यात आला. या कालावधीत नागरिकांना घरीच राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मात्र शारीरीक हालचालींची कमतरता, बैठी जीवनशैली यामुळे पाठीसह पोटांच्या समस्याही बळावल्या आहे.
छातीत जळजळ, ओटी पोटात दुखणं, मळमळणं, गिळण्यास अडचणी, पोट खराब होणं असे त्रास लोकांना होऊ लागले आहेत.
गॅस्ट्रोएसोफेगल रिफ्लक्ससारख्या पोटाच्या आजारात वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. लॉकडाऊन कालावधीमध्ये या आजाराच्या रुग्णांमध्ये 70 टक्क्यांनी वाढ झाली असून हे रुग्ण 25 ते 50 वयोगटातील आहेत, अशी माहिती मुंबईतील अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटलमधील लॅप्रोस्कोपिक जीआय सर्जन डॉ. इरबाज रियाझ मोमीन यांनी दिली.
लॉकडाऊन कालावधीमध्ये बैठी जीवनशैली, व्यायामाचा अभाव इत्यादी कारणांमुळे गॅस्ट्रोएसोफेगल रिफ्लक्स डीसीज (जीईआरडी) सारख्या आजाराची तक्रार असलेले 3 ते 4 रुग्ण दिवसभरात आढळून येत असल्याचंही डॉ. इरबाज रियाझ मोमीन यांनी सांगितलं.
आर्थिक अडचणी, आरोग्याच्या समस्यांमुळे चिंता वाढली आहे. चहा, कॉफी, अल्कोहोलचं अतिसेवन केल्याने झोपेच्या तक्रारी जाणवू लागल्या आहेत. घरबसल्या लोक अधिक तळलेले किंवा मसालेदार पदार्थ खात आहेत आणि शारीरिक हालचाली मात्र मंदावल्या आहेत. या कारणांमुळे नागरिकांमध्ये पोटाच्या तक्रारी जाणवू लागल्या आहेत, असंही डॉ मोमीन यांनी स्पष्ट केलं.
या आजाराचे वेळीच निदान होणं गरजेचं आहे. कारण उपचारास उशीर झाल्यास गुतांगुत वाढून अन्ननलिकेचा कर्करोग होण्याची शक्यता 25 पट वाढते.
अॅसिड रिफ्लक्स असल्यास प्रदीर्घकाळ अँटी-अॅसिडिटी औषधं दिली जाऊ शकतात ज्यामुळे आम्लाचं प्रमाण कमी होतं. काही रुग्ण लेप्रोस्कोपिक अँटी-रिफ्लक्स शस्त्रक्रियेचा पर्यायसुद्धा निवडू शकतात जे अॅसिड रिफ्लक्सला प्रतिबंध करतं.
नियमित व्यायाम, नियंत्रित वजन, प्रमाणात आहार यामुळे पोटाच्या समस्यांपासून आराम मिळतं. तसंच रात्री उशिरा जेवण, जेवणानंतर लगेच झोपणं आणि कॉफीचं अतिसेवन टाळावं, असा सल्लाही डॉ. मोमीन यांनी दिला.