भारतात या आजारामुळे दरवर्षी सर्वाधिक मृत्यू होतात.
सध्या जगात कोरोनाव्हायरस कित्येकांचा जीव घेतो आहे. त्यामुळे संपूर्ण जगाचं लक्ष त्याच्याकडेच आहे. मात्र कोरोनामुळे भारतात सर्वाधिक जीवघेण्या असलेल्या गंभीर अशा आजाराकडे सध्या दुर्लक्ष होतं आहे.
भारतात कोरोनापेक्षाही सर्वाधिक जीवघेणा आजार आहे तो म्हणजे टीबी. दरदिवशी हजारो रुग्ण सापडणाऱ्या या आजाराचं प्रमाण सध्या कमी झाल्याचं दिसतं आहे आणि याबाबत तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे.
बीबीसीमध्ये प्रकाशित रिपोर्टनुसार जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, दरवर्षी जगातील एकूण टीबी रुग्णांपैकी एक तृतीयांश भारतात असतात.
भारतात दरवर्षी टीबीमुळे 480,000 लोकांचा मृत्यू होतो. भारत सरकारच्या अंदाजित आकेडवारीनुसार टीबी देशात दरदिवशी 1,300 लोकांचा जीव घेतो. ही आकडेवारी कोरोनाव्हायरसच्या आधीची आहे. कोरोना काळात टीबी रुग्णांच्या आकडेवारीत घट झाली आहे.
बिहारचे प्रमुख टीबी अधिकारी डॉ. केएन सहाय यांनी सांगितल, कोरोना आल्यानंतर आरोग्य विभागाचं पूर्ण लक्षण कोरोना उपचाराकडे आहे. कर्मचाऱ्यांची याआधीदेखील कमी होती. त्यात गेल्या महिन्यांत कोव्हिड केअर सेंटर आणि घरोघरी जाऊन नमुने जमा करण्यासाठी त्यांना पाठवण्यात आलं.
फक्त सरकारी रुग्णालयंच नाही तर खासगी टीबी क्लिनिकही बंद आहेत. त्यामुएळ टीबी प्रकरणांमध्ये 30% घट झाली आहे आणि हे चिंताजनक आहे, असं डॉ. सहाय म्हणाले.
एपिडिमिओलॉजी अँड ग्लोबल हेल्थमधील कॅनडा रिसर्च चेअर आणि मॅकगिल आंतरराष्ट्रीय टीबी सेंटरचे प्रमुख डॉ. मधु पाई यावर केस स्टडी करत आहेत. टीबीचं मुळापासून उच्चाटन करण्याचं लक्ष्य जवळपास 5 वर्ष पुढे ढकलावं लागू शकतं, असं डॉ. पाई म्हणाले.