पावसाळा म्हटलं की इतर आजारांप्रमाणे त्वचेच्या समस्याही आल्याच.
कडक उन्हाच्या झळामुळे अंगाची लाहीलाही झाल्यानंतर सर्वांना हवाहवासा वाटणारा पाऊस आता सुरू झाला आहे. पण पावसाळा ऋतू म्हटलं की, आजारपण आलंच. त्याचप्रमाणे पावसाळ्यात जाणवणाऱ्या सतत ओलाव्यामुळे काहींना त्वचेच्या तक्रारीही सहन कराव्या लागतात.
पावसाच्या पाण्यात सतत राहिल्याने, पाय ओले राहिल्याने त्वचेला खाज उठणे, त्वचा लाल पडणे किंवा त्वचा फाटणे अशा समस्या उद्भवतात.
पावसाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी याविषयी मीरारोड येथील वोक्हार्ट रुग्णालयातील त्वचारोगतज्ज्ञ डॉ. मधुलिका म्हात्रे यांनी काही टीप्स दिल्यात.
आपली त्वचा हायड्रेट करा. यासाठी अंघोळीनंतर एक चांगले मॉइश्चरायझिंग क्रिम लावा, यामुळे आपल्या संवेदनशील त्वचेवर संरक्षणात्मक थर तयार होतो आणि त्वचेला खाज येत नाही.
ओल्या चपला वापरू नयेत, यामुळे पायांच्या बोटांमध्ये बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याचा धोका वाढतो.
बाहेरून आल्यावर लगेच आंघोळ करा. विशेषत: आंघोळ केल्यावर तुम्ही आपले शरीर पूर्णपणे कोरडे करून घ्या.
जर तुम्हाला गंभीर पुरळ उठत असेल तर लवकरात लवकर त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घ्या कारण तुम्हाला तोंडावाटे अलर्जीविरोधी औषधांची आवश्यकता असू शकते.
पावसाळ्यात त्वचेची समस्या जाणवल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध घेऊ नये किंवा औषध विक्रेत्यांकडून कुठल्याही प्रकारची क्रिम डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय लावणे टाळा. कारण, अनेक क्रिममध्ये स्टेरॉइड्स असल्याने त्वचेची समस्या वाढू शकते.