सिंगापूर, 09 ऑगस्ट: नऊ महिने आईच्या उदरात वाढलं, की बाळ या जगात जन्म घेतं. त्याचा आईच्या उदरातला नऊ महिन्यांचा कालावधी हा त्याच्या पुरेशा शारीरिक वाढीसाठी निसर्गाने केलेली तरतूद असते; पण काही कारणाने बाळ लवकर जन्माला आलं किंवा वेळेआधी आईची प्रसूती करावी लागली, तर ते बाळाच्या आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक असतं. अशा बाळांची खूप काळजी घ्यावी लागते. सिंगापूरमध्ये (Singapore) अलीकडेच अशा एका बाळाने जन्म घेतला आणि खूप अडचणींवर मात करत आता ते घरीही पोहोचलं आहे. त्या बाळाच्या नावावर विक्रम नोंदवला गेलाय तो म्हणजे जगातलं सर्वांत लहान बाळ (Tiniest Baby) म्हणून जन्माला येण्याचा. क्वेक यू झुआन (Kwek Yu Xuan) असं या नवजात मुलीचं नाव असून, ती जन्माला आली तेव्हा तिचं वजन फक्त 212 ग्रॅम एवढंच होतं, तर लांबी 24 सेंटीमीटर एवढीच होती. ही मुलगी जगण्याची शक्यता फारच कमी होती; मात्र तिने मृत्यूशी यशस्वीपणे लढा दिला आणि जन्मानंतर 13 महिन्यांनी ती घरीही आली. आता तिचं वजन 6.3 किलोग्रॅम एवढं झालं आहे. ‘बीबीसी’ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. या मुलीची आई वाँग मी लिंग (Wong Mi Ling) यांची गर्भारपणाच्या पाचव्या महिन्यातच इमर्जन्सी सी-सेक्शन शस्त्रक्रियेद्वारे (C-Section) प्रसूती करावी लागली. कारण त्यांना प्री-इक्लॅम्प्सिया (Pre-Eclamspia) नावाची आरोग्यसमस्या निर्माण झाल्याचं निदान झालं. गर्भवती स्त्रियांना होणारी ही एक दुर्मीळ, गंभीर आरोग्यसमस्या असून, त्यात रक्तदाब इतक्या प्रचंड प्रमाणात वाढतो, की ते आई आणि बाळ या दोघांसाठीही प्राणघातक ठरू शकतं. सिंगापूरच्या नॅशनल युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये (National University Hospital) त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली आणि तब्बल 15 आठवडे म्हणजे जवळपास चार महिने आधी क्वेक यू झुआनचा जन्म झाला. 212 ग्रॅम वजन आणि केवळ 24 सेंटीमीटर लांबी असलेलं हे बाळ जगण्याची फारशी शक्यता नव्हती, असं तिथल्या डॉक्टर्सना वाटत होतं; तिच्या आईलाही एवढं छोटं बाळ पाहून धक्का बसला; पण या मुलीवर वेगवेगळ्या प्रकारचे उपचार करण्यात आले. वेगवेगळ्या यंत्रांचं साह्यही घेण्यात आलं. डॉक्टर्सनी तिला जगवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले आणि तिने त्या प्रयत्नांना प्रतिसाद देत स्वतः मृत्यूशी लढा दिला. कोविड-19च्या नकारात्मक वातावरणात या बाळाने सर्वांनाच प्रेरणा दिली आहे, असं हॉस्पिटलने म्हटलं आहे. जन्मावेळी एखाद्या सफरचंदाएवढं वजन असलेल्या क्वेक यू झुआनचं वजन 13 महिन्यांनंतर आता 6.3 किलो झालं आहे. तिला अद्यापही फुप्फुसांचा गंभीर विकार आहे; त्यामुळे घरी गेल्यानंतरही तिला श्वासोच्छ्वासासाठी मदत लागणार आहे; मात्र आता तिची घरी काळजी घेणं शक्य आहे, असं डॉक्टर्सनी म्हटलं आहे. जसजशी ती मोठी होईल, तसतशी तिच्या प्रकृतीत सुधारणा होईल, असं डॉक्टर्सनी म्हटलं आहे. एवढे महिने हॉस्पिटलमध्ये राहिल्याने बिलही साहजिकच प्रचंड झालं होतं; मात्र क्राउडफंडिंगद्वारे (Crowdfunding) 3,66,884 सिंगापूर डॉलर्स म्हणजे 2,70,601 अमेरिकी डॉलर्स एवढा निधी उभारण्यात या मुलीच्या आई-वडिलांना यश आलं. त्यामुळे ते हॉस्पिटलचं बिल भरू शकले. यापूर्वी 2018 साली अमेरिकेत जन्मलेली एक मुलगी फक्त 245 ग्रॅम एवढ्या वजनाची होती. ‘युनिव्हर्सिटी ऑफ आयोवा’मध्ये ‘टायनिएस्ट बेबीज रजिस्ट्री’ म्हणजे छोट्या बाळांची नोंद केली जाते. त्या माहितीनुसार, अमेरिकेत 2018 साली जन्मलेली मुलगी सर्वांत छोटी असल्याचं आतापर्यंत मानलं जात होतं; आता मात्र सिंगापूरच्या क्वेक यू झुआनच्या नावावर हा विक्रम नोंदवला गेला आहे.