तामिळनाडू, 22 जून : हल्ली सोशल मीडियावर शिक्षकांची टिंगल-टवाळी करणारे आपण अनेक मेसेज पाहातो. पण तामिळनाडूमधील हे दृश्य पाहिल्यानंतर खरंच शिक्षकांबद्दलचा आदर…प्रेम काय असतं वेगळं सांगायची गरज नाही. तामिळनाडूतल्या थिरुवल्लूरमध्ये वेलिआग्राम गावातल्या सरकारी शाळेत इंग्रजी शिकवणाऱ्या जी. भगवान यांची बदली झाली. त्यांच्या बदलीची ऑर्डर निघाली आणि भगवान सरांच्या विद्यार्थ्यांच्या काळजाचं पाणी-पाणी झालं.
भगवान सरांची बदली अरुणगुलम गावातल्या शाळेत झालीय. भगवान सरांच्या निरोपाचा क्षण आला आणि त्याचे विद्यार्थी धाय मोकलून रडायला लागले. कोणी त्यांना मिठ्या मारल्या, कोणी त्याच्या हाताला धरुन थांबवलं, तर कोणी त्याच्याभोवती कडं घालून त्याला रोखण्याचा आटोकाट प्रयत्न केला. विद्यार्थ्यांचं प्रेम पाहून भगवान सरानाही अश्रू अनावर झाले. सरांचे आपल्या मुलांसोबत निर्माण झालेले बंध दिसून येत होते. या मुलांसाठी भगवान सर हे शिक्षकापेक्षाही त्यांचे मित्र होते.