मुंबई तसंच महाराष्ट्राच्या काही भागात पुढील दोन दिवस जोरदार पाऊस अपेक्षित आहे, अशी माहिती कुलाबा वेधशाळेकडून देण्यात आली आहे.
मुंबई, 05 सप्टेंबर : मुंबई आणि उपनगरांमध्ये सोमवारपासून (2 सप्टेंबर) धुमशान घातलेल्या पावसाचा जोर मध्यरात्रीपासून ओसरला आहे. सध्या हा पावसाचा जोर जरी कमी झाला असला तरी आज दिवसभर राज्यात अनेक महत्त्वाच्या ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा भारतीय हवामान खात्याक़डून देण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईकरांनी अति महत्त्वाची कामं असल्यासच घराबाहेर पडा असा इशारा देण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे कोलमडलेली तिन्ही मार्गावरील लोकल सेवा पुन्हा सुरू झाली आहे. पहाटेपासून तिन्ही रेल्वे मार्गावरील लोकल धावू लागल्या असून वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येत आहे. यामुळे बुधवारी घराकडे पोहोचू न शकणाऱ्या नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. सीएसएमटीहून कर्जतकडे जाणारी लोकल सेवा सुरू करण्यात आली आहे. पहाटे 3.17 वाजता अंबरनाथच्या दिशेनं पहिली लोकल रवाना करण्यात आली. मुंबईसह उपनगरात बुधवारी सकाळपासून जोरदार पाऊस सुरू होता. यामुळे सखल भागांमध्ये पाणी साचून जनजीवन विस्कळीत झालं होतं. मुसळधार पावसाचा फटका रस्तेसह रेल्वे वाहतुकीला बसला होता. सायन-कुर्ला-चुनाभट्टीदरम्यान ट्रॅकवर पावसाचं पाणी साचल्यानं मध्य रेल्वे पूर्णतः ठप्प झाली होती. मुसळधार पावसाचा इशारा पाहता मुंबई, ठाणे आणि कोकणातील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. आज पुन्हा मुंबईमध्ये अतिवृष्टीचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारीदेखील मुंबईसह ठाणे, रायगड, सिंधुदूर्ग, पुणे आणि कोल्हापुरात मुसळधार पाऊस होणार आहे. त्यामुळे आज हवामान खात्याकडून ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे.तर काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. समुद्रात वाऱ्याचा वेग वाढणार असल्याने मच्छिमारांना किनाऱ्यावर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. तर मुंबईकरांनाही गरज पडल्यासच बाहेर पडण्याच्या सुचना देण्यात आल्या आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार विदर्भ, गडचिरोलीमध्येही अतिवृष्टी होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. तर नाशिक आणि पुण्यामध्ये घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस होईल. खरंतर गेल्या काही दिवस पावसाने चांगलीच दडी मारली होती. पण राज्यात पावसासाठी अनुकूल वातावरण असल्याने येत्या 8 सप्टेंबरपर्यंत बहुतांश भागात पाऊस असाच सक्रिया राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात असून मुंबईकरांना समुद्रकिनारी जाण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे.