केएल राहुलने ऑकलंडमध्ये झालेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात 50 चेंडूत नाबाद 57 धावा करत भारताच्या विजयात महत्वाची भूमिका पार पाडली.
न्यूझीलंडविरुद्धच्या 5 सामन्यांच्या टी20 मालिकेताली दुसरा सामना भारताने 7 गडी राखून जिंकला. न्यूझीलंडने दिलेलं 133 धावांचं आव्हान भारताने 17.3 षटकांत 3 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं.
यष्टीरक्षक केएल राहुलने सलग दुसऱ्या सामन्यात अर्धशतकी खेळी केली. त्याने श्रेयस अय्यरसोबत 86 धावांची भागिदारी केली. अर्धशतकी खेळी करताना केएल राहुलने अशी कामगिरी केली ज्यामुळे पंत आणि धोनीही मागे पडले.
केएल राहुलने सलग दोन टी-20 सामन्यात अर्धशतके लगावली. अशी कामगिरी करणारा तो भारताचा पहिलाच यष्टीरक्षक ठरला आहे. केएल राहुलने पहिल्या टी20 सामन्यातही 56 धावांची खेळी केली होती.
आतापर्यंत टी-20 मध्ये केएल राहुलने 11 अर्धशतकं केली आहेत. तसेच सलग तीन अर्धशतकं करणारा तो भारताचा तिसरा खेळाडू ठरला आहे. विराटने 2012, 2014 आणि 2014 मध्ये तर रोहितने 2018 मध्ये अशी कामगिरी केली होती.
न्यूझीलंडमध्ये दोन टी20 सामन्यात अर्धशतकं करणारा केएल राहुल पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे. श्रेयस अय्यर, सुरेश रैना, रोहित शर्मा, युवराज सिंग यांनी न्यूझीलंडमध्ये प्रत्येकी एक अर्धशतक केलं आहे.