भोपाळ, 02 जानेवारी : 4 वर्ष एकाच जिल्ह्याचे कलेक्टर म्हणून रेकॉर्ड करणाऱ्या IAS अधिकाऱ्याचा नव्या वर्षात कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. जगभरात नव्या कोरोनाचा धुमाकूळ सुरू आहे आणि त्याचं सावट भारतावरही असताना वर्षाच्या सुरुवातीलाच ही दु:खद बातमी समोर आली आहे. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे कोरोनातून बरं झाल्यानंतर तीन दिवसांनी या अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशातील गृहविभागात सचिव पदावर असलेल्या IAS अधिकारी मसूद अख्तर यांचं कोरोनाचा संसर्गामुळे निधन झाल्याची माहिती मिळाली आहे. शुक्रवारी सकाळी 8 वाजता त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखलकरण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे अख्तर कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. IAS मसूद अख्तर यांना कोरोनामुळे फुफ्फुसांचा संसर्ग झाला होता. त्यांची कोरोना चाचणी देखील पॉझिटिव्ह आली होती. त्यांच्यावर महिनाभर रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारातून बरे झाल्यानंतर त्यांना घरी आणण्यात आलं. टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर तीन दिवसांनी पुन्हा त्यांची प्रकृती बिघडली. हृदयविकाराचा झटका आला आणि रुग्णालयात व्हेंटिलेटवर उपचारासाठी दाखल करण्याआधीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. हे वाचा- मोठी बातमी! देशात सर्वांना मोफत मिळणार कोरोनाची लस, आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा सेवानिवृत्त IAS रमेश भंडारी यांनी दिलेल्या माहितीनुसार अख्तर छतरपुराचे अनेक वर्ष साधारण 4 वर्षांहून अधिक काळ जिल्ह्याधिकारी म्हणून राहिले होते. त्यांनी इंदूरच्या अहिल्याबाई विद्यापीठातून एलएलएम केले. ते 1986 च्या राज्य प्रशासकीय सेवेचे अधिकारी होते. त्यांच्या पश्चात पत्नी अंजू अख्तर आणि 8 वर्षाचा मुलगा असं कुटुंब आहे. IAS मसूद अख्तर हे मध्य प्रदेशचे पहिले IAS अधिकारी आहेत ज्यांचा कोरोनानं मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशात कोरोनाच्या नवीन केसेस समोर येत असताना ही चटका लावून जाणारी बातमी नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मिळाली आहे.