मुंबई : मुलांच्या सुरक्षित भविष्यासाठी पालकांची धडपड सुरू असते. त्यामुळे मुलं लहान असतानाच ते त्यांच्यासाठी गुंतवणूक सुरू करतात, जेणेकरून भविष्यात त्यांना त्याचा फायदा होईल. मुलांसाठी सुरक्षित गुंतवणूक करायची असेल तर पीपीएफ म्हणजेच पब्लिक प्रॉव्हिडंट फंड हा एक चांगला पर्याय आहे. पीपीएफमध्ये चांगल्या व्याज दरासह कर सूट देखील दिली जाते. त्यात थोडी रक्कम जमा करून मोठी रक्कम जमा करता येते. PPF मध्ये गुंतवणुकीची वेळेची मर्यादा 15 वर्षांपर्यंत आहे. तुम्ही मुलाच्या नावाने पीपीएफ अकाउंटही उघडू शकता. पालकांनी अगदी सुरुवातीलाच मुलाच्या नावावर या योजनेत गुंतवणूक केल्यास भविष्यात त्यांना चांगला रिटर्न मिळू शकतो. मूल 18 वर्षांचे होईपर्यंत पालक त्यांच्या खात्यात गुंतवणूक करतात, 18 वर्षांचे झाल्यानंतर मूल स्वतःचं खातं सांभाळू शकतात व त्यात गुंतवणूक करू शकतात. मुलांच्या नावाने PPF खाते उघडण्याची प्रक्रिया जाणून घेऊयात. पीपीएफ खाते उघडण्याची प्रक्रिया ज्या बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये तुम्हाला खातं उघडायचं आहे, तिथे तुम्हाला पीपीएफ खाते उघडण्याचा फॉर्म मिळेल. सर्वात आधी तुम्ही फॉर्ममध्ये विचारलेली माहिती भरा. फॉर्मसोबत, मुलाचे पालक किंवा कायदेशीर पालक यांचे पासपोर्ट साईझ फोटो आणि केवायसी कागदपत्रे द्यावी लागतील. याशिवाय मुलाच्या वयाचा पुरावा द्यावा लागेल. तुम्ही मुलाचे बाल आधार कार्ड, रुग्णालयातील जन्म प्रमाणपत्र किंवा इतर कोणतेही सरकारी वैध डॉक्युमेंट जन्मतारखेचा पुरावा म्हणून सादर करू शकता. नंतर सर्व कागदपत्रांसह फॉर्म सबमिट करा. यानंतर मुलाच्या नावाने पीपीएफ खातं उघडलं जाईल. अनेक बँका पीपीएफ खातं ऑनलाइन उघडण्याची सुविधाही देतात, पण यासाठी मुलाच्या पालकाचे बँकेत बचत खाते असणे आवश्यक आहे. मुलांसाठी पीपीएफ खातं उघडण्याचे फायदे - पीपीएफ योजनेचा पहिला फायदा म्हणजे याद्वारे तुम्ही चांगली रक्कम जमा करू शकता. जितक्या लवकर तुम्ही मुलासाठी हे खाते उघडाल तितकं चांगल. समजा तुमचं मूल 3 वर्षांचं आहे आणि तुम्ही 15 वर्षांसाठी मुलाच्या नावावर PPF खातं उघडलं, तर अशा परिस्थितीत मूल 18 वर्षांचे होईपर्यंत तुम्ही त्याच्यासाठी चांगली रक्कम जमा करू शकता. - PPF द्वारे मिळणारी एकरकमी रक्कम भविष्यात तुमच्या मुलाच्या करिअरसाठी खूप मदतीची ठरू शकते. त्या पैशांच्या मदतीने तुम्ही त्याला बाहेर शिकण्यासाठी पाठवू शकता, त्याचा बाहेर राहण्याचा खर्च उचलू शकता, तसेच कोणत्याही प्रोफेशनल कोर्सची फी भरू शकता.
- सर्वात महत्त्वाचं म्हणजे या योजनेत तुम्हाला इतर सर्व बचत योजनांपेक्षा चांगले व्याज मिळते. सध्या पीपीएफ योजनेवर 7.1 टक्के व्याज मिळत आहे. तसेच, इन्कम टॅक्स कायद्याच्या कलम 80C अंतर्गत कर सूट देण्याची तरतूद आहे. जर मुलाच्या PPF खात्यात जमा केलेली रक्कम त्याच्या पालकांच्या कमाईतून जमा केली असेल, तर पालक त्यावर कलम 80C अंतर्गत कर सूट देखील घेऊ शकतात. - या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला बचत करण्याचीही सवय लागेल. तुम्हाला दर महिन्याला खात्यात काही पैसे टाकावेच लागतील. तुम्हाला बचत करताना पाहून तुमच्या मुलालाही बचतीची आवश्यकता व महत्त्व कळू लागेल.