मुरादाबादमध्ये पितळ आणि आर्टिफिशियल दागिन्यांचा व्यवसाय करणारा एक मुलगा देशातल्या सगळ्यात मोठ्या राजकीय घराण्याचा जावई कसा बनला याची कहाणी रंजक आहे. जी मुलगी सतत कडेकोट सुरक्षेत असायची तिला रॉबर्ट यांनी प्रपोज कसं केलं असेल याबद्दल सगळ्यांना उत्सुकता आहे.
ही लव्ह स्टोरी सुरू झाली सुमारे 25 वर्षांपूर्वी. रॉबर्ट आणि प्रियांका दिल्लीतल्या एका ब्रिटिश स्कूलमध्ये शिकले पण वेगवेगळ्या वर्गात. रॉबर्ट वाड्रा यांची बहीण मिशेल ही प्रियांकाची क्लासमेट होती. तिनेच एक दिवस रॉबर्ट आणि प्रियांकाची भेट घडवून आणली. 1986 मध्ये त्यांची पहिली भेट झाली. त्यावेळेस प्रियांका 13 वर्षांच्या होत्या आणि रॉबर्ट 15 वर्षांचे. त्यानंतर ते भेटतच राहिले.
प्रियांका आणि रॉबर्ट यांची मैत्री इतकी वाढत गेली की रॉबर्ट नेहमी पंतप्रधानांच्या निवासस्थानी जायला लागले. ते गांधी परिवारात चांगले मिसळले. प्रियांका आणि रॉबर्ट तासन् तास गप्पा मारत असत. घर ही अशी जागा होती की प्रियांकाला सुरक्षारक्षकांचा वेढा नसायचा आणि ते एकमेकांना जास्त वेळ देऊ शकत होते. 1991 मध्ये जेव्हा राजीव गांधी यांची निवडणूक प्रचाराच्या वेळी श्रीपेरांबुदुरमध्ये हत्या झाली तेव्हा प्रियांका गांधींची भावनिक पातळीवर कसोटी होती. त्या अक्षरश: कोलमडून गेल्या होत्या. त्यावेळी रॉबर्ट वाड्रा यांनी त्यांना धीर दिला.ते प्रियांकांना जास्त वेळ देऊ लागले. याच काळात दोघंजण जवळ आले.
1992 मध्ये जेव्हा प्रियांका गांधी कडक सुरक्षाव्यवस्थेत रॉबर्ट वाड्रा यांना भेटायला गेल्या तेव्हा त्यांच्या नात्याबदद्ल जोरदार चर्चा सुरू झाली. प्रियांका आणि रॉबर्टमध्ये काहीतरी चाललं आहे, असं बोललं जाऊ लागलं. रॉबर्ट वाड्रा जेव्हा दिल्लीला यायचे तेव्हा ते प्रियांकांसाठी महागडे दागिने घेऊन यायचे. प्रियांका यांना हे दागिने खूप आवडायचे.
1996 मध्ये रॉबर्ट वाड्रा हे प्रियांका गांधींना भेटायला त्यांच्या घरी आले तेव्हा त्यांनी तिला लग्नाची मागणी घातली. प्रियांकांचं आपल्यावर प्रेम आहे याची खात्री रॉबर्ट यांना होती. म्हणूनच त्यांनी जेव्हा 'प्रपोज' केलं तेव्हा प्रियांकांनी त्यांना हो म्हटलं. सोनियांनी जेव्हा रॉबर्ट यांच्या कुटुंबाबद्दल माहिती काढली तेव्हा रॉबर्ट यांचे वडील काळजीत पडले कारण त्यांचा मुलगा देशातल्या एका बड्या घराण्याचा जावई होणार होता.
18 फेब्रुवारी 1997 ला प्रियांका गांधी आणि रॉबर्ट वाड्रा विवाहबद्ध झाले. दिल्लीमध्ये 10 जनपथ या सोनियांच्या निवासस्थानी हिंदू रितीरिवाजांनुसार हा विवाहसोहळा पार पडला.