त्रिनिदाद, 15 ऑगस्ट : भारतानं टी20 पाठोपाठ एकदिवसीय मालिकासुद्धा जिंकली. विराट कोहलीचं शतक आणि श्रेयस अय्यरच्या अर्धशतकाच्या जोरावर भारतानं तिसरा एकदिवसीय सामना जिंकला. दरम्यान, यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत पुन्हा एकदा चुकीचा फटका खेळून बाद झाला. त्रिनिदादमध्ये झालेल्या तिसऱ्या सामन्यात पंत पहिल्याच चेंडूवर खातंही न उघडता फाबियान एलनच्या चेंडूवर किमो पॉलच्या हाती झेल देऊन बाद झाला. शिखर धवन बाद झाल्यानंतर पंत मैदानात उतरला. त्यावेळी विराट कोहली खेळत होता. भारताला विजय मिळवण्यासाठी मोठ्या भागिदारीची गरज होती. तेव्हा संयमानं खेळ करण्याची आवश्यकता होती. मात्र, पंतने पहिल्याच चेंडूवर चुकीचा फटका मारला आणि बाद झाला. यावेळी पंतच्या एका हातातून बॅट निसटली. पंतचा असा खेळ पाहून विराटसुद्धा चकीत झाला. त्याच्या चुकीवर काय बोलणार असेच भाव विराटच्या चेहऱ्यावर होते. भविष्यात धोनीची जागा पंत घेणार आहे. पण बेजबाबदार फटके मारून पंत बाद होत असल्यानं अशी जागा घेणार का? असाच प्रश्न विचारला जात आहे. आतापर्यंत अनेकवेळा पंतनं त्याला मिळालेली संधी गमावली आहे. वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये, टी20 मालिकेत आणि दुसऱ्या सामन्यातही पंत चुकीच्या फटक्यामुळं बाद झाला. त्यानं मोक्याच्या क्षणी विकेट गमावली. पंतने गेल्या दोन्ही सामन्यात विकेट गमावल्यानंतर श्रेयस अय्यरनं जबरदस्त खेळी केली. मिळालेल्या संधीचा फायदा उठवत त्यानं दोन्ही सामन्यात अर्धशतकी खेळी केली. पंत तरूण आहे आणि त्याला संधीसुद्धा मिळत आहे. मात्र ज्या पद्धतीनं तो फलंदाजी करत आहे ती धोक्याची आहे. धोनीचा उत्तराधिकारी म्हणून पंतकडे पाहिलं जातं पण मैदानावर टिकून राहण्याऐवजी तो लवकर बाद होतो. त्यामुळं भारतासाठी ही डोकेदुखी ठरू शकते. तसेच भारताचा चौथ्या क्रमांकाचा प्रश्न पुन्हा पुढे येत आहे. भारताच्या दिग्गज खेळाडूंनीसुद्धा पंतला चौथ्या क्रमांकावर न खेळवता खालच्या क्रमांकावर खेळवता येईल असं म्हटलं आहे. दुसरीकडे श्रेयस अय्यरनं चौथ्या क्रमांकासाठी आपण योग्य असल्याचं खेळीतून दाखवून दिलं आहे. अय्यरबद्दल बोलताना विराट म्हणाला की, पुन्हा श्रेयसनं माझं काम सोपं केलं. वेगवेगळ्या क्रमांकावर अशी जबाबदारी घेणारे खेळाडू हवे आहेत असंही विराट म्हणाला. दबावाखाली खेळताना त्यानं संयमाने आणि समन्वय साधत खेळ केला अशा शब्दांत श्रेयस अय्यरचं कौतुक केलं. दौंड : कुरकुंभ MIDC मध्ये केमिकल कंपनीला भीषण आग