मुंबई 5 मार्च: लग्नसोहळा (weddings) म्हटलं तर धमाल आलीच. पूर्वी ज्यापद्धतीनं लग्नसोहळा व्हायचा त्यामध्ये हळूहळू बरेच बदल होत गेले. हल्ली लग्नसोहळा म्हटलं की मुलगा आणि मुलीच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य या सोहळ्याला अविस्मरणीय करण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाहीत. सोशल मीडियावर (Social Media) लग्नसोहळ्याचे फोटो आणि व्हिडिओ टाकले जातात. या माध्यमातून त्यांच्या आनंदात सर्वच जण सहभागी होतात. अशा फोटो आणि व्हिडिओची नेहमीच चर्चा होत असते. सध्या सोशल मीडियावर लग्नसोहळ्यातला असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये आनंदीत झालेले नवरा- नवरी सात फेरे (phera) घेताना डान्स करताना दिसत आहेत. या व्हिडिओवर नेटिझन्सच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. बऱ्याच भारतीय परंपरा आणि हिंदू विवाहांमध्ये पवित्र अग्निभोवती सात फेरे घेण्याची प्रथा महत्वपूर्ण मानली जाते. या विधी वेळी कुटुंब आणि मित्र परिवाराच्या उपस्थितीत नवरा-नवरी पवित्र अग्निभोवती सात वेळा फेरे घेतात. मंगळवारी वेदांत बिर्ला नावाच्या एका ट्विटर युजर्सनं हा व्हिडिओ आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन शेअर केला. वेदांत बिर्ला यांनी ट्विट करत नवरा-नवरीने सात फेरे घेताना केलेल्या डान्सवर टीका केली आहे.
वेदांत बिर्ला यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये नवरा-नवरी आनंदाच्या भरात सात फेरे घेताना डान्स करत आहेत. तर त्यांच्या आजूबाजूला उभे राहिलेले नातेवाईक देखील टाळ्या वाजवत डान्स करत प्रोत्साहन देताना दिसत आहेत. वेदांत बिर्ला यांनी ट्विटमध्ये असं म्हटलं आहे की, ‘हे लग्न आहे की संस्काराची अहुती? हे विसरु नका की तुम्ही या जगामध्ये पूजनीय आहेत तर फक्त आपल्या संस्कृती आणि संस्कारामुळे.’ हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडिओला कमी वेळातच 6.3 लाख व्ह्यूज मिळाले आहेत. तर एक हजारांपेक्षा जास्त युजर्सनी यावर कमेंट्स केल्या आहेत. या व्हिडिओवर सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. अनेक ट्विटर युजर्सनी या व्हिडिओवर टीका करत नाराजी व्यक्त केली आहे.
वेदांत बिर्ला यांच्या मताला सहमती देत एका ट्विटर युजरनं असं म्हटलं आहे की, ‘मला कळत नाही की कुटुंबातील वडिलधाऱ्या व्यक्तींनी त्यांना असं करायला परवानगी कशी दिली.’ तर अशोक शेट्टी नावाच्या एका युजरने देखील या व्हिडिओवर संताप व्यक्त केलाय. ते असं म्हणाले की, ‘आजचा विवाहसोहळा म्हणजे फक्त फोटोग्राफी आणि ते सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करणे. विधी आणि परंपरांचा अजिबाद आदर नाही.’
दरम्यान, काही ट्विट युजर्सनी नवरा-नवरीच्या डान्सला पाठिंबा दिला आहे. एक युजर असं म्हणला की, ‘मला यात काही चूक दिसत नाही. लग्नसोहळा कसा साजरा करायचा ही त्यांची पसंती आहे. अजूनही 18 व्या शतकात राहतात.’ दरम्यान, वेदांत बिर्ला आणि एका पत्रकाराला उत्तर देताना एक युजर असं म्हणाला की, ‘यात काय चुकीचं आहे मला दिसत नाही. त्यांना हवं तसं लग्न त्यांनी केलं. कोणीही कोणाला व्हिडिओ पाहायला भाग पाडत नाही.’