वैभव सोनवणे, पुणे, ता.16 नोव्हेंबर : रस्ता बांधकामात भ्रष्टाचार झाल्याच्या घटना काही नव्या नाहीत. पुण्यात मात्र, चक्क रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येच कंत्राटदाराने पैसे खाल्ल्याचा गंभीर आरोप झालाय. पुण्यातल्या नदी पात्रात मनपानेच बांधलेल्या बेकायदा रस्त्याचा वाद आता खूप जुना झालाय. पर्यावरणवाद्यांनी हा मुद्दा हरित लवादापासून ते थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत नेल्यानंतर अखेर हा रस्ता उखडून टाकण्याचे आदेश निघाले होते. त्यानंतर मग मनपाने रस्ता तोडण्याचे टेंडरही काढले मात्र त्यातही भ्रष्टाचार झाल्याची माहिती पुढं आलीय. विठ्ठलवाडी ते वारजे असा साधारण 24 मीटरचा रस्ता होता. अगदी गुगल मॅपवर ही रस्ता तेवढाच दिसतोय पण पालिकेने रस्ता उखडण्यासाठी टेंडर काढले ते 30 मीटरचं आणि प्रत्यक्षात कंत्राटदाराला बील चुकतं केलं ते तब्बल 54 मीटरचं…! माहिती अधिकारात हा सगळा गैरप्रकार समोर आलाय.
पुणे मनपा बांधकाम विभागाचे अधिकारी मात्र या गैरप्रकारावर मूग गिळून गप्प बसलेत, त्यामुळे ज्या कोणी अधिकाऱ्याने या कंत्राटदाराची बीलं मंजूर केली त्याच्यावर काय कारवाई होणार आणि कंत्राटदाराला चुकते केलेले अतिरिक्त बीलाचे पैसे नेमकं कोण आणि कशी वसूल करणार ? असा सवाल पुणे सजग नागरिक मंचाने उपस्थित केलाय.