18 ऑक्टोबर : एका साधू बाबाला स्वप्न पडतं की, गावातील पडलेल्या किल्ल्याखाली तब्बल 1 हजार टन सोनं पुरलेलं आहे. या बाबाच्या स्वप्नावर अख्ख्या गावाच्या विश्वास बसतो आणि याची दखल घेऊन भारतीय पुरातत्व विभाग खोदकामाला सुरूवातही केलीय. उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यातल्या दुंडिया खेरा या गावात हा प्रकार घडलाय. दुंडिया खेरा या गावातल्या शोभन सरकार या साधूला एक स्वप्न पडलं की गावातल्या 19 व्या शतकातील राजा राव रामबख्श सिंह यांच्या किल्ल्याखाली 1 हजार टन सोनं पुरलेलं आहे. त्यामुळे सामान्य लोकच नाही, तर थेट सरकारी यंत्रणाही या स्वप्नावर विश्वास ठेवून कामाला लागली आहे. पुरातत्व विभागाने आज सकाळपासून सोन्याच्या खजिन्याच्या शोधासाठी अधिकार्यांनी हातोडा, छिन्नी, अशा पारंपरिक हत्यारांनी खोदकामाला सुरुवात केलीये. पुरातत्व विभागाचे अधिकारी गेल्या 4 दिवसांपासून या गावात आहेत. मात्र, फक्त स्वप्न पडलं म्हणून नाही, तर या साधूबाबांकडे खजिन्याचा नकाशा असल्यामुळे खोदकाम सुरू करण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. सोन्याचा खजिनाच्या बातमी हा हा म्हणता वार्यासारखी पसरली. या गावात हौशा-नवशा, बघ्यांची एकच गर्दी केलीय. मीडियानेही ‘गोल्डन न्यूज कव्हर’ करण्यासाठी तळ ठोकला आहे. प्रत्यक्ष खोदकाम सुरु झाल्यामुळे, आणि प्रश्न सोन्याचा असल्यामुळे या ठिकाणी लोक मोठ्या प्रमाणात जमा झाले आहे खबरदारी म्हणून या गावात सुरक्षा व्यवस्था मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आली आहे. त्याचवेळी कर्मचारी आणि लोकांसाठी खाण्यापिण्याचे स्टॉल्सही लागले आहेत. एकंदरीतच गावाला जत्रेचं स्वरूप आलंय.