20 जानेवारी : केंद्रीय मंत्री शशी थरूर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू औषधांच्या अतिसेवनाने झाला अशी माहिती सूत्रांनी दिलीय. सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूचा अंतिम पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये तणावविरोधी औषधांच्या अतिसेवनानं त्यांचा मृत्यू झाला असं म्हटलं आहे. सुनंदा यांच्या शरीरावर 12 हून जास्त जखमा असल्याचा निष्कर्षही अहवालात नमूद करण्यात आला आहे पण या जखमाच्या खुणा प्राणघातक नाहीत असंही स्पष्ट करण्यात आलंय.
मात्र प्राथमिक रिपोर्टमध्ये सुनंदाचा मृत्यू आकस्मिक अनैसर्गिक झाल्याची माहिती स्पष्ट झाली होती. त्यामुळे एकाच अहवालात दोन वेगवेगळे रिपोर्ट आले आहे. एम्स हॉस्पिटलमध्ये तीन डॉक्टरांच्या टीमने हा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट तयार केलाय. मागील आठवड्यात 17 जानेवारी रोजी दिल्लीतील हॉटेल लीलामधील रूम नंबर 345 मध्ये सुनंदा पुष्कर यांचा मृतदेह सापडला होता.
सुनंदा यांच्या मृत्यूच्या दोनच दिवसाअगोदर शशी थरूर यांच्या ट्विटरवरुन पाकिस्तानी पत्रकार मेहर तरार यांच्या नावे ट्विट केल्यामुळे वाद झाला होता. सुनंदा यांनी थरूर यांच्यावर नाराजी व्यक्त करत आमच्यातले संबंध संपुष्टात आले अशी टोकाची भूमिकाही घेतली होती. जाहीररित्या झालेल्या वादानंतर आपण सुखी जोडपं असून आनंदानं राहत आहोत असं दोघांनी संयुक्तपणे जाहीर केलं होतं. त्यानंतर या वादावर पडदा पडल्याचं मानलं जात असतानाच ही शुक्रवारी संध्याकाळी सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूची बातमी आली. 18 जानेवारी रोजी शनिवारी संध्याकाळी सुनंदा यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी पोस्टमार्टेमचा अंतिम अहवाल आता हाती आलाय. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.