26 फेब्रुवारी : आयएनएस सिंधुरत्न अपघात प्रकरणी नौदलप्रमुख डी. के. जोशी यांनी पदाचा राजीनामा दिलाय. नेव्हीच्या पाणबुड्यांना वारंवार होत असलेल्या अपघातांची नैतिक जबाबदारी स्वीकारत नौदलप्रमुखांनी राजीनामा दिलाय. सरकारनं त्यांचा राजीनामा ताबडतोब स्वीकारलाय. या राजीनाम्यामुळे सर्वांनाच धक्का बसलाय. जुलै 2015पर्यंत त्यांचा कार्यकाळ होता. पण, आता त्यांनी राजीनामा दिल्यामुळे जवळपास वर्षभर आधीच ते या पदावरून पायउतार होतील.
गेल्या सात महिन्यांत नेव्हीच्या 3 पाणबुड्यांना अपघात झाले. आज सकाळी सहा वाजती आयएनएस सिंधुरत्न या पाणबुडीला अपघात झाला. पाणबुडीवर आग लागल्यामुळे हा अपघात घडलाय. या घटनेत नेव्हीचे दोन अधिकारी बेपत्ता झाले आहेत. तर 7 जण जखमी झाले आहे. जखमींना आयएनएस अश्विनी या नेव्हीच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय.
तर पाणबुडीतल्या 87 जणांचा संपर्क झालाय. सिंधुरत्नच्या ज्या कंपार्टमेंटमध्ये ही आग लागली त्याठिकाणी विषारी धूर पसरला. आगीचं कारण अजून समजू शकलेलं नाहीय. या घटनेच्या चौकशीचे आदेश नेव्हीनं दिले आहे. पाणबुडीचा अपघात होण्याची गेल्या 7 महिन्यांतली ही दुसरी घटना आहे. गेल्या ऑगस्ट महिन्यात आयएनएस सिंधुरक्षक या पाणबुडीचा अपघात झाला होता. त्यात 18 जवानांचा मृत्यू झाला होता.
नौदलाच्या पाणबुड्यांना अपघात