28 फेब्रुवारी : सिंधुरत्न पाणबुडीला झालेल्या अपघातात प्राण गमावलेल्या दोन नौदलाच्या अधिकार्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. अपघातात लेफ्टनंट कमांडर कपिश मुवाल आणि लेफ्टनंट मनोराजन कुमार या दोन नौदल अधिकार्यांना आपले प्राण गमवावे लागले. या अधिकार्यांना आज (शुक्रवारी) संपूर्ण शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला.
बुधवारी सकाळी सिंधुरत्न पानबुडीमध्ये आग लागली होती. या दुर्घटनेत या दोन्ही अधिकार्यांचा धुरानं गुदमरून मृत्यू झाल्याचं नौदलाकडून सांगण्यात आलंय. पाणबुडीवर आग लागल्याची सर्वात आधी माहिती मुवाल यांना मिळाली होती, असंही नौदलानं सांगितलंय. या अपघाची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती बसवण्यात आलीय. ही समिती पाणबुडीवर उपस्थित सर्व 85 जणं आणि जखमी झालेल्या सात जणांचे जबाब नोंदवणार आहे.
हा अपघात टाळता आला असता, असं कपिश मुवाल यांच्या भावानं म्हटलं आहे. तर आम्हाला भरपाई नको, त्यापेक्षा ते पैसे यंत्रसामुग्रीच्या आधुनिकीकरणासाठी वापरावे, असंही या पीडितांनी म्हटलं आहे.
दरम्यान, सिंधुरत्न पाणबुडी दुर्घटना प्रकरणी जबाबदारी स्विकारून संरक्षणमंत्री ए.के. अँटोनी यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपनं केली आहे. सिंधुरत्नच्या अपघातप्रकरणी फक्त नौदलांच्या प्रमुखांच्या राजीनाम्याचा उपयोग नाही. तर संरक्षणमंत्र्यानीही राजीनामा दिला पाहिजे, असं भाजपचे प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी म्हटलंय.