18 डिसेंबर : लोकसभेत लोकपाल विधेयक मंजूर झाल्यानंतर जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी नारळपाणी पिऊन आज आपले नऊ दिवसांचे उपोषण सोडले. “लोकपाल विधेयक मंजूर केल्याबद्दल राळेगणसिद्धी परिवार आणि भारतीय जनतेच्या वतीने लोकसभा आणि राज्यसभेच्या समाजवादी पार्टी वगळता बाकी सर्व खासदारांना प्रणाम करतो.” या शब्दात अण्णांनी आपला आनंद व्यक्त केले.
पहिल्यांदा लोकसभेत आलेलं विधेयक राज्यसभेत गेल्यानंतर, या विधेयकात जनतेच्या हितानुसार पुन्हा एकदा सुधारणा करण्यात आल्या आणि ते सुधारित विधेयक लोकसभेत मांडण्यात आले. अखेर आज दुपारी एकच्या सुमारास लोकसभेत हे विधेयक मंजूर करण्यात आले आणि राळेगणसिद्धीत आनंदाच वातावरण पसरले. या विधेयकामुळे शंभर टक्के नाही पण किमान 50 टक्के तरी भ्रष्टाचार कमी होईल असा विश्वास अण्णांनी व्यक्त केला आहे. तसेच, या आंदोलनात सहकार्य करणार्यांना, आंदोलनाला पाठिंबा देणार्या सगळ्यांचे अण्णांनी आभार मानले आहेत. लोकपाल कायदा फक्त बनवून चालणार नाही तर त्याची अंमलबजावणी होणं आवश्यक आहे असंही मत अण्णांनी बोलताना व्यक्त केले.