16 जानेवारी : काँग्रेसचे केंद्रीय मंत्री शशी थरूर सोशल साईट्सवर अग्रेसर असल्याचं सर्वश्रुत्र आहे. पण आता थरूर आपल्याच एका ‘ट्विट-ट्विट’मुळे वादात सापडले आहे. शशी थरूर यांचे एका पाकिस्तानी पत्रकार मेहर तरार यांच्याशी प्रेमसंबंध असल्याचा आरोप शशी थरूर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांनी केलाय.
इतकंच नाही तर तरार या पाकिस्तानची गुप्तचर संघटना असलेल्या आयएसआयच्या एजेंट असल्याचा आरोपही सुनंदा यांनी केलाय. आता आमच्यात प्रेम आणि विश्वास नावाची गोष्ट संपली आहे अशी नाराजी सुनंदा यांनी व्यक्त केली. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सुनंदा यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.
पण हा सगळा प्रकार घडला तो शशी थरूर यांच्या टिवट्मुळे. बुधवारी थरूर यांच्या अधिकृत टिवट्र अकाऊंटवरून मेहर तरार यांच्याबद्दल काही टिवट् अपडेट झाले. या टिवट्मुळे थरूर आणि मेहर यांच्यात काही तरी सुरू असल्याची चर्चा सुरू झाली त्यामुळे एकच गोंधळ उडाला. पण काही वेळातच थरूर यांनी आपले टिवट्र अकाऊंट हॅक झाल्याचं जाहीर केलं. त्यामुळे झालेला गैरसमज दूर झाला. पण थरूर यांच्या पराक्रमाचा त्यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांनी चांगलाच समाचार घेतला. थरूर यांचे टिवट्र अकाऊंट हॅक झालेच नाही. त्यांचे आणि पाकिस्तानी पत्रकार मेहर तरार यांच्याशी प्रेमसंबंध आहे असा आरोप त्यांनी केला. त्यामुळे थरूर यांची चांगलीच पंचाईत झाली.
तर दुसरीकडे सुनंदा पुष्कर यांच्या आरोपांमुळे मेहर तरार यांना चांगलाच धक्का बसला. सुनंदा पुष्कर यांच्या या आरोपांचं तरार यांनी स्पष्ट शब्दात खंडन करत सुनंदा पुष्कर यांच्यावर मानहानीचा दावा ठोकणार असल्याचं म्हटलंय. शशी थरूर यांनी मात्र हा वाद निरर्थक असल्याचं म्हटलंय. या सर्व प्रकारावर शशी थरूर यांनी एक निवेदन प्रसिद्ध केलंय. “आमच्या ट्विटर अकाउंटवरून करण्यात आलेल्या काही अनधिकृत ट्विटवरून जो वाद निर्माण झालाय, यामुळे आम्ही व्यथित झालोय. आम्हाला हे स्पष्ट करायचं आहे की, आम्ही आनंदी आहोत आणि तसंच रहायचं आहे. सुनंदाची प्रकृती सध्या बरी नसल्यानं तिला या आठवड्यात हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. ती सध्या आराम करतेय.” असं थरूर यांनी स्पष्ट करत प्रकरणावर पडदा टाकला.