17 डिसेंबर : तब्बल 40 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अखेर लोकपाल विधेयक आता कायद्यात रुपांतरीत होणार आहे. आज राज्यसभेत लोकपाल विधेयकाला मंजुरी देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. लोकपाल विधेयकावर दुरुस्त्यांवर आवाजी मतदान घेण्यात आलं आणि विधेयक मंजूर करण्यात आलंय.
आता उद्या बुधवारी लोकपाल विधेयक लोकसभेत मांडलं जाणार आहे. लोकसभेत विधेयकावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर पुढे राष्ट्रपतींकडे स्वाक्षरीसाठी पाठवलं जाणार आहे. लोकपालवर मतदानाला सुरूवात होताच अण्णा हजारे यांच्या गावी राळेगणसिद्धीमध्ये एकच जल्लोष सुरु झाला. अण्णांनी राज्यसभेचे आभार मानत उद्या लोकसभेत मंजूर झाल्यानंतर उपोषण सोडणार असल्याचं जाहीर केलं.
आज सकाळी राज्यसभेत लोकपालवर चर्चा सुरू झाली. त्याअगोदरच या विधेयकाला काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा आहे, असं काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींनी स्पष्ट केलं होतं. तर भाजपचे राज्यसभेतले विरोधी पक्षनेते अरूण जेटली यांनी भाजपची भूमिका मांडली. या विधेयकाला भाजपचा पूर्ण पाठिंबा आहे, असं त्यांनी घोषित केलं.
या विधेयकात त्यांनी काही सुधारणाही सुचवल्या. पण, विधेयकाला विरोध असणार्या समाजवादी पार्टीनं सभात्याग केला. शिवसेनेनंसुद्धा लोकपाल विधेयकाबाबत विरोधाची भूमिका ठाम ठेवली. अखेर राज्यसभेत विधेयकावर आवाजी मतदान घेण्यात आलं आणि मंजूरही करण्यात आलं. आता उद्या या बिलावर लोकसभेत चर्चा होणार आहे.